esakal | "कोल्हापूरकरांनी मनावर घेतले तर विजय निश्‍चित"
sakal

बोलून बातमी शोधा

meetings of mahavikas aghadi speech for Rural Development Minister Hasan Mushrif

हसन मुश्रीफ; लाड, आसगावकर यांच्या विजयाचा निर्धार

"कोल्हापूरकरांनी मनावर घेतले तर विजय निश्‍चित"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विरोधकांच्या तोडीस तोड यंत्रणा उभी करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले. शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व पदवीधरमधील अरुण लाड यांचा प्रचार घरोघरी, बूथपर्यंत पोचवा आणि पदवीधर व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांना विजयी करा, असेही आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह मंत्री, आमदारांनीही दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आश्‍वासन देत विजय निश्‍चित असल्याचे जाहीर केले. उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सैनिक दरबार हॉलमध्ये मेळावा झाला.


मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकाऱ्यांनी बूथपर्यंत पोचले पाहिजे. शिक्षक मतदारसंघातून आसगावकर यांचे नाव पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले आहे. पूर्वीच्या आमदारांनी पदवीधरांचे काहीच प्रश्‍न सोडविले नाहीत आणि आता चंद्रकांत पाटील महामंडळ स्थापन करणार म्हणतात. त्यांनी गेली सहा वर्षे काय केले?’’ 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्याची आश्‍वासने देऊन निवडून येणाऱ्यांनी काहीच केले नाही. चंद्रकांत पाटील विजयी झाले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेना होती. आता ती आघाडीत आहे. त्यामुळे त्याचाही फरक आता दिसून येईल. कोल्हापूरकरांनी मनावर घेतले तर विजय निश्‍चित आहे.’’


पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘मतपत्रिकेतील पहिली पसंती दाखवा आणि बाहेर पडा. कारण लाड आणि आसगावकर दोघेही पहिल्या क्रमांकावर आहेत. आम्ही सर्व नेत्यांनी दोघांची जबाबदारी घेतली आहे.’’


उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘गेल्या सरकारमध्ये शिक्षणाचे ६७ जीआर काढले आणि मागे घेतले; मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये शैक्षणिक हिताचेच निर्णय झाले. आचारसंहिता संपल्यानंतरही प्राध्यापक, शिक्षक, बेरोजगारांच्या मनाप्रमाणे निर्णय आघाडी घेईल.’’


कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘आसगावकर कोल्हापूरचे असले तरीही ते सांगलीचे जावई आहेत आणि लाड तर सांगलीचेच आहेत; त्यामुळे दोघांचाही विजय महत्त्वाचा आहे. धनुष्य मारण्यासाठी घड्याळ घालून हात तयार आहे.’’
माघार घेतलेल्या पाचही इच्छुकांचे सत्कार केले. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने, आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, पी. एन. पाटील, शिवसेनेचे अरुण दुधवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या सुरुवातीला शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पोवार यांनी आभार मानले.


त्यांना ट्रॅकवर आणले
‘‘सतेज पाटील, मीही तुमच्याकडून शिकलो आहे. मेळाव्यात असतानाही पुण्यातील एका संस्थाचालकांची माहिती तुमच्यापर्यंत पोचली. काही जण ट्रॅक सोडून जात होते. तुम्ही सांगितल्यानंतर सर्वांना ट्रॅकवर आणले आहे. सरकार पडेल, असे भविष्य वर्तविणाऱ्या कोकणातील नेत्याला व्यासपीठावर आणले पाहिजे. म्हणजे कळेल तिन्ही पक्षांची एकवाक्‍यता किती आहे,’’ असे मंत्री सामंत यांनी सांगितले.उमेदवारांचे आवाहन
उमेदवार आसगावकर आणि लाड यांनीही भूमिका मांडली. यापूर्वी पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी बोलण्यापलीकडे काहीच केले नाही. आता मतदारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आघाडी सरकार पाठीशी आहे.

हेही वाचा- ....आणि मामाचे गावही गहिवरले! -

आवाडे यांना ऑफर
आमदार प्रकाश आवाडे यांनीही आता सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये यावे, असे मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले. आता एकच विरोधी पक्ष आहे, त्यामुळे आमदार आवाडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची जाहीर ऑफर मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

आपलं ठरलंय
मागील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून होतो. त्यांचा विजय झाला होता. ही चूक मान्य करून ती दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. आता आपलं ठरलंय. त्यामुळे आसगावकर आणि लाड दोघांचाही विजय निश्‍चित आहे, असे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे