
पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला
कोल्हापूर - अवकाशविषयक तंत्रज्ञान आणि ग्लोबल सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम (जी.एन.एस.एस.) यांच्या संशोधनात आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. ऑनलाईन पद्धतीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ""सुरवात "जीएनएसएस' विषयक संशोधन सहकार्याने होत असली तरी केवळ तेवढ्यापुरताच हा करार मर्यादित राहू नये, तर दोन्ही विद्यापीठांतील विविध अधिविभागांनी पुढे येऊन हे शैक्षणिक, संशोधनविषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्याची अधिक उत्तम फळे मिळतील.
बरद्वान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ए. के. पाणिग्रही म्हणाले, ""शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला हा सामंजस्य करार आनंददायी क्षण आहे. अवकाश संशोधनाच्या अनुषंगाने डाटा विश्लेषणात शिवाजी विद्यापीठाची कामगिरी उच्च दर्जाची आहे. या सहकार्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांचा अवकाश संशोधनातील लौकिक निश्चितपणे वाढीस लागेल.
हे पण वाचा - मंगलकार्यालयातून सहा तोळ्याचा सोन्याचा हार लंपास
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर बरद्वान विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. अभिजित मुझुमदार यांनी स्वाक्षरी केल्या. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. आर. के. कामत, डॉ. पी. के. चक्रवर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. के. वाय राजपुरे यांनी स्वागत केले. डॉ. राजीव व्हटकर, बरद्वान विद्यापीठाचे डॉ. अनिंद्य बोस यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
संपादन - धनाजी सुर्वे