महिला तक्रार निवारण कक्षाकडून पुरुषांच्या तक्रारीची दखल

राजेश मोरे
Friday, 30 October 2020

कोल्हापूरः दारूचे व्यसन सोडतो, मला कुटुंबासोबत राहायचंय. बस्स एक संधी द्या! अशी एक संधी मागणाऱ्या पुरुषाचीही दखल महिला तक्रार निवारण कक्षाने घेतली. त्या संधीचे सोने त्याने करत व्यसन सोडले. व्यवसाय सुरू केला. तसा राजा-राणीचा पूर्वीप्रमाणे संसार सुरू झाला. फक्त महिलांचीच नव्हे, तर पुरुषांच्याही तक्रारीची दखल घेऊन समुपदेशनातून ताणलेल्या संसाराची घडी बसविण्याचे काम कक्षाकडून केले जात आहे. 

कोल्हापूरः दारूचे व्यसन सोडतो, मला कुटुंबासोबत राहायचंय. बस्स एक संधी द्या! अशी एक संधी मागणाऱ्या पुरुषाचीही दखल महिला तक्रार निवारण कक्षाने घेतली. त्या संधीचे सोने त्याने करत व्यसन सोडले. व्यवसाय सुरू केला. तसा राजा-राणीचा पूर्वीप्रमाणे संसार सुरू झाला. फक्त महिलांचीच नव्हे, तर पुरुषांच्याही तक्रारीची दखल घेऊन समुपदेशनातून ताणलेल्या संसाराची घडी बसविण्याचे काम कक्षाकडून केले जात आहे. 
पोलिस मुख्यालयातील महिला तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित आहे. महिलांवरील अत्याचार, अन्यायसंबंधी येथे हेल्पलाईद्वारे तक्रारी येतात. या तक्रारीची दखल कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. समुपदेशनातून कुटुंबातील ताणलेले नातेसंबध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा कक्ष महिला तक्रार निवारण नावाने जरी कार्यरत असला तरी येथे पुरुषांच्याही तक्रारी घेतल्या जातात. यासंबंधी तक्रार देणाऱ्यापासून संबंधितांचे समुपदेश करण्याचे काम केले जाते. 
प्रेमविवाह केलेले एक दाम्पत्याला एक मुलगीही आहे. पत्नी शिक्षित, पतीचे शोरूम पण लॉकडाउनमध्ये ते बंद झाले. यातच पतीला व्यसन लागले. त्याला कंटाळून पत्नी व मुलीने विभक्त राहण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेतला. पतीने याबाबत तक्रार निवारण कक्षात धाव घेतली. हाताला काम नसल्याने अस्वस्थ झालो. मला कुटुंबासोबतच राहायचं आहे, अशी विनंती केली. त्याचे समुपदेश करण्यात आले. त्याला एक संधी देण्यात आली. त्या संधीचे सोनं त्याने केले. दारूचे व्यसन सोडलं. व्यवसाय सुरू केला. तसा त्याचा पूर्वीसारखा सुखी संसार सुरू झाला. 
हे होतं एक प्रातिनिधिक उदाहरण. लॉकडाउन काळात अनेकांच्या हाताचे काम गेले. तसे पती पत्नीत गैरसमज निर्माण होऊ लागले. त्यातून घरगुती तंटे वाढू लागले. यासंबंधी महिलांबरोबर पुरुषांच्याही तक्रारी या कक्षाकडे येऊ लागल्या. याची दखल घेत समुपदेशनानंतर ताणलेल्या 14 संसाराची पुन्हा घडी बसविण्यात कक्षाला यश आले आहे. या कक्षाची धुरा उपनिरीक्षक विभावरी रेळेकर यांच्यासह कर्मचारी स्वप्नाली काकडे, नलिनी लाळगे, सुनीता सोनसुरकर, रेखा पाटील, सविता दाभाडे, बिस्मिला पठाण, अंजली केसरकर, वंदना मधाळे, सरिता जाधव यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. 

दृष्टिक्षेपात... 
मार्चनंतर दाखल तक्रारी - 116 
निर्गत ः 98 
पुरुषांच्या दाखल तक्रारी - 20 
निर्गत - 14 

महिलांप्रमाणे पुरुषांच्याही तक्रारीची दखल महिला कक्षात घेतली जाते. समुपदेशनातून संसाराची घडी बसविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न येथे केला जातो. 
- विभावरी रेळेकर, उपनिरीक्षक, महिला तक्रार निवारण कक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men's grievance redressal from women's grievance redressal cell