दूर्गम चिक्केवाडीचे होणार स्थलांतर.. 

Migration to Chikkewadi
Migration to Chikkewadi

कोल्हापूर  : या गावात सातच घरे, गाव जंगलात, सात घरात मिळून तीस भर माणूसच गावात, गावच्या एका बाजूला सलग 12 किलोमीटर जंगल आणि दुसऱ्या बाजूला रांगणा किल्ल्याचे पठार, म्हणजे गावाचे एक टोक भुदरगड तालुक्‍यात तर दुसरे टोक कोकणाला भिडलेले. गावात जे काही लोक आहेत ते सारे पन्नाशीच्या वरचे, गावात एकही तरुण नाही, एक ही तरुणी नाही, लहान बाळ नाही. शाळा नाही. एसटी नाही, दवाखाना नाही, एवढेच काय पावसाळ्यात चार महिने गावातील रहिवाशांना घरात कोंडून घेऊन बसण्यावाचून मार्ग नाही. 

चिक्केवाडी (ता. भुदरगड) गावची पिढयांपिढयाची ही अवस्था आहे. पण या गावाला आता आशेचा किरण मिळाला आहे. पिढ्यानपिढ्या असे एका टोकाला जंगलात राहण्याऐवजी या चिकेवाडीच जंगलाबाहेर भटवाडीजवळ बसवण्याचा विचार सुरू झाला आहे. 

खुद्द भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी चिक्केवाडी गावकऱ्यांना तशी विनंती केली आहे. सर्वांनी मान्यता दिली तर त्या गावातील लोकांना राहण्यासाठी सोयीची किंवा बऱ्यापैकी नागरी सुविधा मिळेल, अशी जागा देण्याची प्रशासनाची तयारी आहे. चिकेवाडीतील त्यांची शेत जमीन त्यांच्याच नावावर कायम राहील, त्यांनी शेतीपूरते चिक्केवाडीला जावे आणि नव्या जागेत कायमस्वरुपी राहावे असे या स्थलांतराचे स्वरूप आहे. रांगणा किल्ल्यापासून अलिकडे अवघ्या तीन ते चार किलोमीटरवर चिक्केवाडी गाव आहे. हे गाव म्हणजे मानवी वस्तीचे शेवटचे टोक. 
येथून पुढे जी पायवाट सुरु होते ती रांगणा किल्ल्यावर जाते. व किल्ल्यावरून खाली कोकण दरवाज्याने कोकणात सावंतवाडी तालुक्‍यात जाऊन थांबते. गारगोटी ,पाटगाव, तांब्याची वाडी, आडे, भटवाडी ते चिक्केवाडी हे अंतर साधारण 40 किलोमीटर आहे. पाटगाव हेच या मार्गातले मोठेगाव. पुढे वस्ती विरळ होत जाते व दोन्ही बाजूस दाट झाडीचे जंगल सुरु होते. जंगलात बिबटे अस्वलांचा वावर आहे. एसटी 
भटवाडीपर्यंत जाते, तेथून चिक्केवाडी खाचखळग्याच्या रस्त्यातून दोन मोठे नाले ओलांडून खाजगी वाहनानेच जावे लागते. 
गावात एकही तरुण नाही. लहान मुले नाहीत. शाळा 12 किलोमीटरवर लांब आणि तेही चालत जायचे हे शक्‍यच नाही, त्यामुळे मुलांना गावात ठेवलेच जात नाही. मुलांना घेऊन त्यांचे आईबाप गावाबाहेर पडतात. बाहेर नोकरी करतात.

कोल्हापुरात अनेक ठिकाणी चहागाड्या आहेत, त्या गाड्या चिक्केवाडीच्या तरुणाच्या आहेत. इथले तरुण मुलाबाळांना घेऊन गावाबाहेर पडतात. पण शेती जनावरांमुळे वृद्ध आईबापांना गावाकडेच ठेवतात. आत्ता गावात तीस-पस्तीसजण जे आहेत ते पन्नाशीच्या वरचे आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते तीन महिन्याचे चटणी, मीठ, साखर तेल आणि इतर वस्तू खरेदी करतात. कारण काड्यापेटी संपली तरी 12 किलोमीटर चालत येऊन भटवाडीत खरेदी करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पावसाळ्यात आजारी पडले तर देवाचे नाव घेऊनच ते दिवस काढतात.

पावसाळा संपला तरी पुढे एक महिना मार्गातले दोन नाले धो धो वाहतात. अंगणातले कुत्रे दिसायचे बंद झाले की बिबट्याने ते उचलले हे बरोबर ओळखतात. या काळात बाहेरच्या जगात काय झाले, हे त्यांना कळत नाही. येते काय झाले ते बाहेर कोणाला कळत नाही. भात आणि नाचना पिकवून इथले लोक जगतात. पावसाळ्यात त्यांच्यातले कोण वारले तर खड्डा काढून पुरुन टाकतात. 

राहायला चला सुविधा देवू ;डॉ.खिलारी 
भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी या गावातल्या लोकांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी पाऊल उचलले आहे. शेती इथेच राहू दे, पण निदान सुरक्षित व सोयीच्या जागी राहायला चला राहायला व्यवस्थित जागा देतो नागरी सुविधा देतो अशी त्यांची विनंती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com