...तर कोणतीही शिक्षा भोगीन! 'या' मंत्र्याने दिले खुले आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

इतर जिल्ह्यांमध्ये जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेली नाही, तिकडे आंदोलन करायला हवे होते.

कोल्हापूर - जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व केडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले. 

या संदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच आंदोलनाचा पुरता फज्जा उडाल्याची टीकाही श्री. मुश्रीफ यांनी केली. 

मंत्री मुश्रीफ यांनी निवेदनात म्हटले आहे, की वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती आधी घ्यायला हवी होती; मग आंदोलन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात न येता, इतर जिल्ह्यांमध्ये जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेली नाही, तिकडे आंदोलन करायला हवे होते. संपूर्ण राज्यभर बॅंकांसमोर आंदोलन करण्याचा निर्णय भाजपने घेतला असताना कोल्हापुरात मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यावरूनच त्यांच्यावर ओढलेली नामुष्की आणि त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाची हवाच गेल्याचे स्पष्ट होते. केडीसीसी बॅंकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकाही शेतकऱ्यांना कर्ज देत आहेत.

हे पण वाचा - फादर्स डे दिवशीच त्याच्यावर आली वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

 

केडीसीसीचे वाटप उद्दिष्टाच्या 158 टक्के 
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समन्वय समितीने केडीसीसी बॅंकेला 2020-21 या शेती हंगामासाठी एकूण खरीप इष्टांक 686 कोटी दिलेला आहे. प्रत्यक्षात केडीडीसी बॅंकेने 1082 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या ही टक्केवारी 158 टक्के आहे. पीककर्ज वाटपात केडीसीसी बॅंक राज्यात अव्वल असल्याकडेही मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष वेधले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचे पैसे आले नसतानाही शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister hasan mushrif challenge to chandrakant patil