सरकार टिकणार नाही अशी टिव-टिव करणाऱ्यांना जयंत पाटलांचा टोला

धनाजी सुर्वे 
Saturday, 28 November 2020

गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी एकत्र येत मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले होते

कोल्हापूर - आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेला आज एक वर्षे पूर्ण झाले. सत्ताधारी याचा आनंद साजरा करत आहेत तर विरोधक एक वर्षात सरकारकडून काय चुकलं हे सांगत आहेत. अनेक नेत्यांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा करत एक जुना फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मंत्री पाटील यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लगावला आहे. 

गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी एकत्र येत मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले होते. तोच फोटो मंत्री जयंत पाटील यांनी शेअर केला आहे. 'आम्ही आलेलो आहोत..आमचा रस्ता मोकळा करा !' असे खुले आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला त्यावेळी दिले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील त्याठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील या ठिकाणी भाजपवर टीका केली होती. 'सत्यमेव जयते असलं पाहीजे सत्तामेव जयते आपण होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते. आम्ही केवळ ५ वर्षांसाठी आलो नाहीत तर ५ चा पाढा म्हणण्यास आलो आहोत असा विश्वासही त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने त्यावेळी व्यक्त केला होता. त्याच क्षणाचा फोटो मंत्री पाटील यांनी आज आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. 

हे पण वाचासाईट पट्टीने घेतला बळी ; भीषण अपघातात तरुण जागीच ठार

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीपासून भाजपमधील काही नेते हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही अशी वक्तव्य करत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायन राणे यांनी तर अनेक वेळा हे सरकार किती दिवसात पडेल याच्या तारखाच दिल्या होत्या. परंतु, अनेक अडचणींचा सामना करत सरकारने आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. याचाच आनंद व्यक्त करत मंत्री पाटील यांनी एक फोटो शेअर केला आहे. 'हे राज्य टिकावे ही तर श्रींची इच्छा' असे कॅप्शन या फोटोला दिले असून यातून सरकार टिकणार नाही अशी टिव-टिव करणाऱ्यांना टोला लगावला असल्याची चर्चा राजकीय वर्तूळातून व्यक्त होत आहे.

 <

>


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister jayant patil tweet on maharashtra vikas aghadi government completes