esakal | रंगाचा बेरंग ; हुल्लडबाजांमुळे या शहरात तणाव 
sakal

बोलून बातमी शोधा

misconduct from youth in ichalkaranji

एसटीवर असे गोळे फेकल्याने काहींना डोळ्याच्या गंभीर इजाना सामोरे जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी सकाळी गस्त वाढवली. तरीही अनेक भागात युवकांनी हुल्लडबाजी केल्याचे निदर्शनास आले.

रंगाचा बेरंग ; हुल्लडबाजांमुळे या शहरात तणाव 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : धुळवड उत्सवाच्या नावाखाली हुल्लडबाजीचा प्रकार यावर्षीही शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना अनुभवास मिळाला. मोठ्या वाहनावर दगड व राखेचे गोळे फेकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवल्यानंतर या प्रकाराला आळा बसला. 

हे पण वाचा -  आता माघार नाही : शिवसेना तालुकाप्रमुखाची भुमिका...

शहरात यापूर्वीही धुळवड उत्सवाच्या नावाखाली होळीतून तयार झालेल्या राखेतून गोळे करून ते फेकण्याचे प्रकार घडले होते. विशेषत: एसटीवर असे गोळे फेकल्याने काहींना डोळ्याच्या गंभीर इजाना सामोरे जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी सकाळी गस्त वाढवली. तरीही अनेक भागात युवकांनी हुल्लडबाजी केल्याचे निदर्शनास आले. मुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी गाड्या अडवून धुळवड मागण्यासाठी युवक आणि लहान मुले हुज्जत घालत होते. काही ठिकाणी तर न थांबता जाणाऱ्या वाहनावर राखेचे गोळे फेकण्यात येत होते. काही भागात रिक्षावरही दगडफेक करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे त्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
दरम्यान अशा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या भागात गस्त वाढवली. पोलिसांची वाहने येताना दिसताच युवक व मुले पळून जात होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत हा प्रकार अनेक ठिकाणी सुरू होता. दरम्यान युवकांबरोबर अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अशा प्रकारामुळे नागरिकही धास्तावले होते. अशा मुलांकडून गाडीवर कधी हल्ला होईल याची शाश्‍वतीच नव्हती. काही ठिकाणी मुलांना समजून सांगणाऱ्या नागरिकांनाच दमदाटी करण्याचे प्रकारही घडत होते. गाडी पुढे नेत असताना ते मागे ओढणे अशा प्रकारातून काही दुचाकी चालक गाडीवरून पडण्याचेही प्रकार घडले. 

हे पण वाचा - यंदा या फळांमध्ये होणार मोठी घट....

एकूणच धुळवडच्या नावाखाली आज अनेक ठिकाणी युवक आणि लहान मुलांनी बेशिस्तीचे दर्शन घडवले.