मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार आवाडे यांना दिली अशी ‘ऑफर’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

स्वगृही परतणार का; मंत्री हसन मुश्रीफांकडून मेळाव्यात ‘ऑफर’

कोल्हापूर: आमदार प्रकाश आवाडे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.  काँग्रेसचे कट्टर असलेले आवाडे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढून ते विजयी झाले. निवडणुकीपूर्वी भाजपची सत्ता असल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. मात्र, महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षाच्या गटात बसावे लागले.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा आज कोल्हापुरात झाला. यावेळी भाषण संपताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये पुन्हा यावे, अशी ऑफर दिली. यामुळे आमदार आवडे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत काय ? याबाबतची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा- देशाचीच सेवा: अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...! -

दरम्यान, याबाबतची माहिती घेतली असता आमदार आवाडे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्नाटकातील एच.के. पाटील यांची भेट घेतल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यांची ही भेट मेळाव्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे आवाडे पुन्हा घरवापसी येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार आवाडे मूळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांना कोणत्याही कारणास्तव पदावरून किंवा पक्षातून काढलेले नाही. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात. ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार आहे काय ? भेटीचा विषय काय होत याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Awade H. K. Patil visit Topic of discussion