चंद्रकांतदादा कोरोनातही राजकारण करू नका ; प्रकाश आबिटकरांनी मारला असा टोला...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

सध्याचा काळ कठीण आहे. वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या भीषण संकटात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार जीवावर उदार होऊन, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, काम करीत आहेत. परंतू चंद्रकांतदादा पाटील व नेते मात्र नुसतीच टीका करून राजकारण करीत आहेत. चांगल्या कामाला चांगले म्हणायची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे, आणि अशा कठीण प्रसंगात तरी राजकारण करू नये असा सल्ला आमदार प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

  यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, सध्याचा काळ कठीण आहे. वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये नाजूक स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली सुक्ष्म नियोजन सुरू असून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार त्यांचे कार्य सुरू आहे. देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना संकटाच्या काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून विरोधी पक्षाने लढण्याची गरज असते. मात्र विरोधी पक्षाकडून दररोज एक-एक टिका करून संकटाच्या काळातही राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात उद्या पासून 'हे' सुरु राहणार 'हे' बंद राहणार...... -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन कोरोनाशी युद्ध लढत आहे. हे देशात कधीही घडताना दिसले नाही. आज राज्यात एकसंध राहून आणि राजकीय मतभेद विसरुन काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यात लोकनियुक्त सरकार असताना भाजपाकडून वारंवार राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगधंदे बंद झाले. कामे ठप्प झाली. रोजगाराचे संकट निर्माण झाले. आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला.

हेही वाचा- जावईबापू सावधान ! लग्नापूर्वी कोरोना ची चाचणी करूनच या...

अशा परिस्थितीत लोकांना धीर देणे, सरकारी मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, प्रशासनाशी संवाद साधणे आणि रोगाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेतानाच जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊ नये आणि स्वतःला कोणतीही आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक होते. ही सारी आव्हाने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी यशस्वीपणे पेलली आहेत. मात्र राज्यावर संकट असतानाही भाजपाला राजकारणाशिवाय काही सूचत नाही. भाजपाने वारंवार  राज्यपालांना सरकारविरोधात निवेदन देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्याला केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla prakash abitkar press conference in kolhapur