आय लिग फुटबॉल स्पर्धेत मोहन बागान विजेतेपदाच्या उंबरठ्यावर

दीपक कुपन्नावर
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

मडगाव (गोवा) येथे सुरू असलेल्या आय लिग फुटबॉल स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या मोहन बागान फुटबॉल क्‍लबने स्थानिक चर्चिल ब्रदर्सचा तीन गोलने सहज पाडाव करून विजेतेपदाचा उंबरठा गाठला. विषेशत: स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात घरच्या मैदानावर झालेला एकमेव पराभवाचा मोहन बागानने बदला घेतला. इंडियन फुटबॉल लीगमध्ये (आय लिग) मोहन बागानने दहाव्या विजयासह 32 गुणामुळे अव्वल स्थान कायम राखले. चर्चिलच्या मोठ्या पराभवामुळे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमलेल्या स्थानिक शौकिनाचा हिरमोड झाला. 

गडहिंग्लज : मडगाव (गोवा) येथे सुरू असलेल्या आय लिग फुटबॉल स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या मोहन बागान फुटबॉल क्‍लबने स्थानिक चर्चिल ब्रदर्सचा तीन गोलने सहज पाडाव करून विजेतेपदाचा उंबरठा गाठला. विषेशत: स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात घरच्या मैदानावर झालेला एकमेव पराभवाचा मोहन बागानने बदला घेतला. इंडियन फुटबॉल लीगमध्ये (आय लिग) मोहन बागानने दहाव्या विजयासह 32 गुणामुळे अव्वल स्थान कायम राखले. चर्चिलच्या मोठ्या पराभवामुळे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमलेल्या स्थानिक शौकिनाचा हिरमोड झाला. 

आय लीगमध्ये यंदा मोहन बागान संघ पूर्ण बहरात आहे. 13 पैकी 10 सामन्यात या संघाने विजयश्री मिळवली असून दोन सामने बरोबरीत राहिले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चर्चिलने कोलकत्यात मोहन बागानला 4-2 असा पराभवाचा धक्का दिला होता. मोहन बागानचा स्पर्धेतील हा एकमेव पराभव आहे. त्यामुळेच या हंगामात स्वप्नवत वाटचाल करणारा मोहन बागान पराभवाचा बदला घेण्यासाठी सर्वस्वपणाला लावणार हे निश्‍चित होते. 

सहाव्या मिनिटाला मोहन बागानचा परदेशी खेळाडू पापा रियावादाने बचाव फळीतील गोंधळाचा फायदा उठवत गोल करून संघाचे मनसुबे स्पष्ट केले. उत्तराधाच्या सुरूवातीलाच 13 मिनिटात मोहन बागानने लागोपाठ दोन गोल करून चर्चिलच्या आव्हानातील हवा काढून घेतली. परदेशी खेळाडू सुहेरने गोल क्षेत्रातून अचूक फाटक्‍याद्वारे गोल करून आघाडी दोन गोलने भक्कम केली.

58 व्या मिनिटाला तुरसो नेव्हने तिसरा गोल करून चर्चिलच्या जखमेवर मीठ चोळले. चर्चिलचा आयलिगमध्ये सर्वाधिक सात गोल नोंदविणारा हुकमी खेळाडू विलिस प्लाजाला मोहन बागानच्या बचाव फळीतील कर्णधार गुरुजीदरकुमार, डॅनियल सायरस, आशुतोष मेहता, फॅन्सिको माटीनेज यांनी जखडून ठेवल्याने चर्चिलच्या आशा संपुष्टात आल्या. चौफेर खेळ करणाऱ्या मोहन बागानच्या फरहान गोनजालेझला भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर सिटमिक यांनी रोख 25 हजार रुपयांचा सामनावीर पुरस्कार प्रदान केला. 

सुखदेव पाटील चमकला 
चर्चिलचा गोलरक्षक सुखदेव पाटीलने उत्तरार्धातील शेवटच्या टप्प्यात हमखास गोल होणारे चार फटके अडवुन उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यामुळे चर्चिल घरच्या मैदानावर नामुष्कीजनक पराभवापासून दूर राहिला. सुखदेव हा कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवे खुर्दचा (ता.कागल) आतरराष्ट्रीय खेळाडू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohan Bagan at the threshold of winning the I-League Football Championship Kolhapur Marathi News