उन्हाळा गेला वाया, पावसाळ्यात शोधला खोदाईला मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

अमृत योजनेतून पाईपलाईनसाठी ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात हे काम सुरू केल्याने हा रस्ता धोकादायक होणार आहे. 

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात रमणमळा येथील पोस्ट ऑफिससमोरचा रस्ता खोदण्यात आला आहे. अमृत योजनेतून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनसाठी ही खोदाई असली तरी उन्हाळा असताना या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात हे काम सुरू केल्याने हा रस्ता धोकादायक होणार आहे. 

महावीर कॉलेज ते रमणमळा मार्गावर रस्ता खोदला आहे. मुळात हा रस्ता दुभाजकांमुळे छोटा झाला आहे, त्यात खोदाई केलेली खरमाती वर टाकल्याने रस्त्याची एक बाजू अरूंद झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही खोदाई सुरू आहे; पण प्रत्यक्ष कामाचा पत्ताच नाही. सुरवातीला जेसीबी मशीनने डांबरी रस्त्यावर खड्डे मारण्यात आले. त्यानंतर पुन्हा खोलपर्यंत चर मारण्यात आली आहे. 

पावसाळा सुरू झाला आहे. आता पाऊस नसला तरी एक-दोन दिवसांत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत हे काम करणेच मुळात चुकीचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेला लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केला आहे. त्यावेळी हे काम करणे शक्‍य होते; पण त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर तर बहुंताशी सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे दिवसभर लोकांसह वाहनांची ये-जा सुरू असते; पण खोदाई केलेला रस्ता अरुंद झाल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडीची शक्‍यता आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी, या परिसरातील लोकांकडून होत आहे. 

दृष्टिक्षेप 
- रमणमळा येथे पोस्ट ऑफीस समोरचा रस्ता 
- पाऊस सुरू झाल्यास रस्ता बनणार धोकादायक 
- दुभाजकामुळे रस्ता आणखी अरूंद 
- मार्गावर बहुतांश सरकारी व महत्त्वाची कार्यालये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moment of digging discovered in rain