पहाटेच्या आगीत बझार जळाला ; 15 लाखांचे नुकसान, कुठे घडली घटना ?

प्रकाश कोकितकर
Tuesday, 15 September 2020

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी अंदाज व्यक्त करण्यात आला.

सेनापती कापशी (कोल्हापूर)  : येथील मध्यवर्ती असलेल्या स्वामी चौकातील किराणा आणि घरगुती वस्तूंच्या विक्री दुकानाला आज पहाटे पावणे पाच वाजता आग लागली. यात संपूर्ण माल जळून खाक झाला. यामध्ये बाजीराव मारुती तेलवेकर यांचे सुमारे पंधरा लाखाचे नुकसान झाले. मंडलिक साखर कारखाना आणि घोरपडे साखर कारखाना यांच्या अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुकानातून आगीचे लोळ बाहेर येत असल्याने आत जाता येत नव्हते. 

हेही वाचा - इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन 

 

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी अंदाज व्यक्त करण्यात आला. मध्यवर्ती असलेल्या स्वामी चौकात नव्याने झालेल्या इमारतीत गेल्या फेब्रुवारी महिन्यात हे दुकान 'कापशी बझार' नावाने सुरू झाले होते. येथे किराणासह घरगुती वापरातील वस्तू मिळत होत्या. दोन मजल्यावर हा बझार होता. जनता कर्फ्यूमुळे आठ दिवस दुकान बंद होते. आज पहाटे पाचच्या सुमारास या इमारतीसमोर राहणारे बाळू शिंदे फिरायला जाण्यासाठी बाहेर पडले असता या दुकानाच्या शटर मधून आग नजरेस पडली. त्यांनी त्वरित दुकानाचे मालक बाजीराव तेलवेकर यांना मोबाईल वरून कळवले. त्यानंतर शटर उघडण्यात आले तेव्हा आगीचे लोळ बाहेर पडत होते. आत असलेले खाद्यतेल आगीचा भडका होण्यास मदत करत होते. 

जवळच असलेल्या हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना आणि काळम्मा बेलेवाडी येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना यांच्या अग्निशामक गाड्यांशी संपर्क करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष आग विझण्यासाठी मोठा कालावधी लागल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे प्रमाण इतके होते की भिंतींचा गिलावाही ढासळला आहे. इमारतीचा समोरील भागही काळवंडला आहे. 

हेही वाचा - मराठा आरक्षण देण्याची राज्यसरकारची इच्छा नाही ; चंद्रकांत पाटील

 

सकाळी दुकानातील जळलेले साहित्य बाहेर काढण्यासाठी उपसरपंच तुकाराम भारमल, अक्षय नाईक, अजय जाधव, ओंकार शिंदे, दयानंद तेलवेकर, अमोल डवरी, प्रकाश निर्मळे बाळू शिंदे, शिवाजी शिंदे, सचिन येजरे, आदी तरुणांनी मदत केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी दत्तात्रय वालावलकर, तुकाराम भारमल उपस्थित होते. घटनेची नोंद मुरगूड पोलिस देण्यात आली.

 

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: morning on 5pm fire in bazar 15 lakh good damage in this fire in kolhapur senapati kapashi