माता कोरोना पॉझिटिव्ह; बाळ मात्र निगेटीव्ह

शिवाजी यादव  
Sunday, 27 September 2020

ज्या महिलांना कोरोनाची लक्षणे दिसतात किंवा कोरोनाची बाधा झाली आहे, अशांना अपवाद वगळता खासगी रूग्णालयात बाळंतपणासाठी ऍडमीटकरून घेतले जात नाही.

कोल्हापूर - कोरोनाची बाधा झालेल्या गरोदर महिलांचे बाळंतपण सीपीआर रूग्णालयात होते. गेल्या पाच महिन्यात 120 कोरोनाबाधित गरोदर महिला आढळल्या आहेत. त्यांची प्रसुती सीपीआर रूग्णालयाच्या प्रसुती विभागात यशस्वी झाली. मात्र यातील फक्त पाच महिलांच्या बाळांना कोरोनाची बाधा झाली आहे. उर्वरीत सर्व महिलांनी जन्म दिलेली बाळ हे कोरोना निगेटीव्ह आहे. त्यामुळे अन्य गरोदर महिलांनी काळजी घ्यावी पण विनाकारण भिती बाळगण्याचे कारण नाही असा धीर डॉक्‍टरांकडून दिला जात आहे. 

गेल्या साडे पाच महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. अशात अनेकांच्या घरात गरोदर महिला आहेत. त्याच घरात नात्यात किंवा परिसरात कोणी कोरोना बाधित आढळल्यास गरोदर मातांना पुढे भिती दाटून येते. आपल्याला कोरोना झाला तर उपचार घेऊ पण बाळाला तर बाधा होणार नाही ना, अशी शंका घेत गरोदर महिला हवालदिल होत आहेत. काही गरोदर महिला गरजे शिवाय जास्त चिंता करीत असल्याने अनेकांना नैराश्‍य येते, रक्तदाब कमी अधिक होतो. यातून चांगली असलेली प्रकृतीही बिघडू शकते. 

ज्या महिलांना कोरोनाची लक्षणे दिसतात किंवा कोरोनाची बाधा झाली आहे, अशांना अपवाद वगळता खासगी रूग्णालयात बाळंतपणासाठी ऍडमीटकरून घेतले जात नाही. तेव्हा अनेक गरोदर महिलांची भिती आणखी वाढते. मात्र सिपीआरच्या प्रसुती विभागात अशा महिलांची बाळंतपणे यशस्वी होत आहेत. त्यामुळे अनेक गरोदर महिलांना बाळंतपणासाठी सीपीआरमध्ये आणले जाते. 

येथे दिवसाला 10 ते 14 गरोदर व कोरोनाबाधित महिलांच्या प्रसुती केल्या जात आहेत. अशा एकूण 120 बाधित महिलांपैकी फक्त पाच महिलांची बालके कोरोनाबाधित आढळली आहेत. हे प्रमाण नगन्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे अन्य गरोदर महिलांनी कोरोना संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी पण विना कारण घाबरण्याचे कारण नसल्याची माहिती डॉक्‍टरांकडून दिली जात आहे. 

हे पण वाचा''छत्रपती घराणे आमची अस्मिता ; खासदार संभाजीराजेंना दुखावण्याचा हेतू नव्हता''

 "" बाधित गरोदर महिला बाळंत झाल्यास तिला कोरोनावरही उपचार सुरू केले जातात. मात्र त्या मातेच्या दुधापासून बाळाला दूर ठेवणे बाळाच्या आरोग्याच्या दृष्ठीने बाधक ठरू शकते. त्यामुळे बाधित माताही बाळाला स्तनपान देऊ शकते. त्यासाठी तिने मास्क लावणे, हात र्निजंतूकीरण करणे त्यानंतर बाळाला स्तनपान देण्यास जवळ घेणे अशी काळजी घेणे महत्वाचे ठरते. किंबहूना अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनेही केली आहे.'' 

-डॉ. सुधीर सरवदे, बालरोग तज्ञ विभाग प्रमुख सीपीआर रूग्णालय 
 
संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother corona positive but baby negative