आजरा तालुक्‍यात रस्त्यासाठी आंदोलकांनी मांडले थेट चिखलात ठाण

रणजित कालेकर
Wednesday, 16 September 2020

बसस्थानक ते विठ्ठल मंदिर पर्यंतचा रस्त्यामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी करत वाघाचा चौक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांन आज चिखलात ठाण मांडत उपोषण केले.

आजरा : बसस्थानक ते विठ्ठल मंदिर पर्यंतचा रस्त्यामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी करत वाघाचा चौक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांन आज चिखलात ठाण मांडत उपोषण केले. आमच्या मागणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे उपोषणाची वेळ आल्याचे सांगत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात उपोषण हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला आहे. 

बसस्थानक ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्त्यात चिखल झाला आहे. यामुळे रस्त्यावरून चालणे अडचणीचे झाले आहे. तसेच या रस्त्यात सांडपाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी वाघाचा चौक तरुण मंडळाचे संस्थापक संकेत सावंत, दिनेश कांबळे, हरीबा कांबळे, पांडुरंग पाईम यांनी आज थेट चिखलात ठाण मांडून आंदोलन केले.

रस्ता तातडीने करावा अशी मागणी लावून धरली. यानंतर सभापती उदयराज पवार, सरपंच उषाताई जाधव, उपसरपंच उत्तम देसाई व ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. रस्त्याबाबत ठोस आश्‍वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्यावतीने पत्रक प्रसिध्दीला देण्यात आले. हे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. याबाबतचे लेखी पत्र संकेत सावंत यांना ग्रामपंचायतीने दिले असतांना त्यांनी जाणिवपुर्वक उपोषण केले. त्यामुळे हा राजकीय स्टंट असल्याचे म्हंटले आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement For Roads In Ajara Taluka Kolhapur Marathi News