शिरोळ - कागलच्या वाट्याला धक्का न लागता इचलकरंजीला मिळणार पाणी ; कसे ते वाचा....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सर्वांसमोर झालेल्या चर्चेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल शासनास पाठविला आहे.

कोल्हापूर : आरक्षित असलेले पिण्याचे एक टीएमसी पाणी दुधगंगा अर्थात काळम्मावाडी धरणातून दिले जाईल. दूधगंगा नदीतून सुळकुड येथून इचलकरंजीला हे पाणी देता येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली आहे. यामुळे कागल आणि शिरोळ तालुक्‍यातील पाणी पुरवठ्याला कोणताही धक्का लागणार नसल्याची आकडेवारी अधिकारी आजच्या बैठकीत दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवला असून, 31 जुलै पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अहवालही शासनाकडे पोहोच केला जाईल. अंतिम निर्णय पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मंत्री,आमदारांसह यांना सोबत घेऊनच होईल, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

तत्पुर्वी त्यांनी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी इतर पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती घेतली. कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम मध्ये आज ही बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी खासदार माने यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. 

इचलकरंजीला दुधगंगेतून पाणी शक्‍य 

सध्या दुधगंगा धरणात उपयुक्त पाणीसाठा 23.99 टीएमसी आहे. पिण्यासाठी आरक्षित म्हणून 5. 95 टीएमसी पाणी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रत्यक्षात वापर 3. 710 टीएमसी आहे. अद्यापही पिण्याचे 1. 14 टीएमसी पाणी सध्या शिल्लक आहे. याच आरक्षित पिण्याच्या पाण्याच्या कोट्यातून हे पाणी सुळकूड मार्गे इचलकरंजीला देता येणं शक्‍य आहे. इचलकरंजीला सध्या केवळ 55 ते 65 एमएलडी पाणी लागते 2049 मध्ये 1 टीएमसी लागेल. ते जरी दिले तरीही शिरोळ आणि कागल या दोन्ही तालुक्‍यातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. या व्यतिरिक्त शेती आणि औद्योगिक वसाहतीला होणारा पाणी पुरवठाही नियमित सुरू राहील, यामुळे इचलकरंजीला काळम्मावाडी धरणातून पिण्याचे पाणी देण्यास कोणताही अडथळा नसल्याचे खासदार माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

हेही वाचा- सावधान ; आंबोलीत जाताय  ; पोलिसांच्या या कारवाईला जावे लागणार सामोरे... -

शिरोळ,कागलच्या पाण्याला धक्का नाही ​

सध्या ही प्राथमिक बैठक आहे. या सर्वांसमोर झालेल्या चर्चेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल शासनास पाठविला आहे.31 जुलैपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडूनही सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. नदीकाठच्या गावातील नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, सर्वांच्या शंका निरसन केल्या जातील. अंतिम निर्णय हा पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह खासदार संजय मंडलिक, मंत्री हसन मुश्रीफ आणि सर्व आमदार यांच्या सोबत बैठक घेऊन केला जाईल, अशी माहिती खासदार माने यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा- भाजपचे शिष्टमंडळ धडकले थेट महावितरणवर ; महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले असे आश्‍वासन.... -

खासदार माने अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक

बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, स्मिता माने ,अमोल नाईक आदी अभियंता तसेच इचलकरंजी नगरपरिषदेचे जलअभियंता बापू साहेब चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी के महाजन उपअभियंता अजय साळुंखे यांच्यासह इतर अधिकारी आणि प्रमुख नेते उपस्थित होते. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP dhayrshil mane press conference in kolhapur