कोणाच्या सांगण्यावरून 'सारथी' बंद करण्याचा घाट घातला गेला ? बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’, संभाजीराजे पुन्हा आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

सारथीला  बदनाम करणाऱ्य़ानो आरोप सिद्ध तरी करा

कोल्हापूर :   सारथी संस्थेला बदनाम करुन त्याची  स्वायत्तता घालवण्यात आली. मात्र  आंदोलनानंतर  स्वायत्तता पुन्हा  मिळाली.   मराठा समाजाने आता शांत न राहता हा घाट  घालणाऱ्य़ा  संबधितांची चौकशीसाठी आक्रमक झाले पाहिजे असे ट्विट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.      

याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सारथी'ला आधी जाणीवपूर्वक बदनाम करून स्वायत्तता घालवली. हि स्वायत्तता टिकविण्यासाठी समाजाच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली, जीवनात पहिल्यांदा 'सारथी'च्या कार्यालयासमोर रस्त्यावर बसून लाक्षणिक उपोषण केले. तसेच हा मुद्दा आजपर्यंत सातत्याने लावून धरल्यामुळे आज 'सारथी' संस्थेला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले गेल्याचे समजते. अजून बरेच टप्पे बाकी आहेत. सारथी बाबत निर्णय घेण्यासंबंधीचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात येतील असे एका 'जी आर' द्वारे सांगण्यात आले आहे. 

 

मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेली आणि मराठा समाजाला दिशा देणारी ही संस्था ठप्प केली गेली. विविध प्रकारचे आरोप करून तिला बदनाम केले गेले. मराठा समाजाचे अमूल्य असे एक ते दीड वर्ष अक्षरशः वाया घालवले. भ्रष्टाचार आणि तत्सम आरोप सिद्ध तरी करा किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र रचणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड तरी करा अशी मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने आम्ही करतो. अशी भुमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje Chhatrapati tweet on sarthi NGO