कोल्हापुरात आतषबाजी: मुंबई इंडियन्सच्या विजयाने दिवाळी साजरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020


आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स समर्थकांत पोस्टर युद्ध भडकले होते.

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या विजयाने शहरात रात्री दिवाळी साजरी झाली. दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळविल्यानंतर समर्थकांच्या जल्लोषाला उधाण आले आणि दिवाळीपूर्वीच आतषबाजीचा दणका उडाला. मुंबई इंडियन्सच्या अभिनंदनाचे मेसेज सोशल मीडियावर झळकले, तर अनेकांच्या व्हाट्‌सॲपवरील स्टेटसवर मुंबई इंडियन्सच्या विजयाचा जागर घालण्यात आला. शहरात मुंबई इंडियन्सचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्याकरिता अंतिम सामना महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना सुरू होताच त्यांच्या नजरा टीव्हीवर स्थिरावल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान मुंबईचे फलंदाज कशा पद्धतीने पूर्ण करतात, याची त्यांना उत्सुकता होती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघावर समर्थकांचा भरवसा होता. 

या सामन्यात अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यानंतर समर्थक सुसाट झाले. दुचाकीच्या पुंगळ्या काढून त्यांनी परिसरात फेरफटका मारला.त्यानंतर आतषबाजी सुरू होऊन दिवाळीच साजरी झाली.समर्थकांनी मोबाईलवर मुंबई इंडियन्सच्या विजयाचे मेसेज एकमेकांना शेअर केले, शिवाय त्यांच्या व्हाट्‌सॲपच्या स्टेटसवर कर्णधार रोहित शर्मासह संघाचा फोटो झळकला. कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक, मुंबई इंडियन्सचा नाद नाही करायचा, पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स, असा अभिमान दर्शवणारा मेसेज स्टेटसवर ठेवला गेला. 

हेही वाचा- तरुणांना पुन्हा एकदा धक्का; नियुक्‍त्या रद्दमुळे मराठा तरुण अडचणीत -

आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स समर्थकांत पोस्टर युद्ध भडकले होते. स्पर्धा भलेही आबूधाबीत असली तरी इथल्या दोन्ही संघांच्या कट्टर समर्थकांत चषक कोण जिंकणार, याची ईर्षा टोकाला पोचली होती. चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मुंबई इंडियन्स समर्थकांना मुंबईचा चषक जिंकणार ही आशा सोडली नव्हती. परिणामी रात्री बारापर्यंत आतषबाजीचा माहोल कायम राहिला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Indians in IPL cricket tournament victory of Kolhapur Firework