स्थानिक रोजगारातील संधी मिळविण्यासाठी आता चाकरमान्यांचे अर्ज

Mumbaikar Now Apply For Local Employment Opportunities Kolhapur Marathi News
Mumbaikar Now Apply For Local Employment Opportunities Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : मुंबईसह उपनगरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या कारणाने गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यांतील चाकरमानी गावाकडे परतले आहेत. तीन महिने उलटले तरी कोरोना संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईहून परतलेले अधिकाधिक चाकरमानी गावाकडेच थांबण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी बहुतांश चाकरमानी स्थानिक रोजगाराच्या शोधात असून कंपनीतील ड्रायव्हरच्या एका पदासाठी आठ ते दहा चाकरमान्यांचे अर्ज आले होते. यावरूनच स्थानिक रोजगारामध्ये चाकरमान्यांचा वाढलेला इंटरेस्ट स्पष्ट होत आहे.

या उपविभागातील निम्म्याहून जास्त गावांतील 25 हजारांपेक्षा अधिक तरुणांनी रोजगारासाठी मुंबई गाठली आहे. दरम्यान, मार्चपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. लॉकडाउन झाले अन्‌ कुटुंबाच्या प्रगतीचे ध्येय बाळगून मुंबईला गेलेल्या तरुणाईच्या हातातील काम थांबले. लॉकडाउन वाढतच चालल्याने उपासमारीची वेळ आली. परिणामी मिळेल त्या मार्गाने ही तरुणाई गावात पोहोचली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मुंबईहून आलेल्या बहुतांशी चाकरमान्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. 

आता हे चाकरमानी हळूहळू गावाशी एकरूप होत आहेत. शेतीच्या कामात कुटुंबाला मदत करत आहेत. घरच्या उपलब्ध जमिनीत खरिपाचा हंगाम साधत आहेत. काही चाकरमान्यांनी दुसऱ्याची शेतीही कसायला घेऊन प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. कोरोना संपण्याचे चिन्ह नसल्याने आता गावाकडेच सेटल व्हायचे या मानसिकतेतून चाकरमान्यांचा भविष्यातील प्रवास सुरू आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मुंबई हळूहळू अनलॉक होत आहे. काही कंपन्या, कारखाने, उद्योग सुरू होत आहेत.

कामासाठी चाकरमान्यांना बोलावणे येत आहे. कंपन्यांमधील काही कामगारांनी परत मुंबई गाठलीसुद्धा. चांगला पगार आणि राहण्यासाठी स्वतंत्र घर असलेले मुंबईला परतत आहेत; परंतु कमी पगार आणि खोल्यांमध्ये राहणारे बहुतांशी कामगार मुंबईत जाऊन कोरोनाचा धोका पत्करत काम करण्यापेक्षा गाव आणि परिसरातच रोजगार शोधून स्थिरस्थावर होण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते.

गडहिंग्लजमधील काही उद्योगांत "लेबर' कामासाठी रोज पाच ते दहा जण चौकशीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले. काही चाकरमान्यांना त्यांची कुटुंबे आता पुन्हा मुंबई नको, इथेच काहीतरी करा, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे संबंधित तरुणाई गावाकडेच सेटल होण्याच्या मानसिकतेत आहे. 

ड्रायव्हरसाठी आठ अर्ज... 
गडहिंग्लजमधील उद्योजक सुनील चौगुले यांच्या इलेक्‍ट्रोटेक या कंपनीतील वाहनासाठी ड्रायव्हरची गरज होती. त्यासाठी त्यांनी अर्ज मागविले होते. या एका पदासाठी मुंबई व पुण्याहून आलेल्या तब्बल आठ जणांनी अर्ज केले होते. यावरून चाकरमान्यांना स्थानिक रोजगाराची किती गरज आहे, हेच लक्षात येते. मुंबईत वीस ते तीस हजार रुपये पगार घेणारे चालक स्थानिक पातळीवर आठ ते दहा हजारांवर काम करण्याची तयारी दर्शवित असल्याचेही श्री. चौगुले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सेंद्रिय शेती प्रशिक्षण 
मुंबईवरून गावी आलेल्या आणि सध्या शेती करणाऱ्या चाकरमानी शेतकऱ्यांसाठी अभिनव ग्रामीण संस्थेतर्फे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. महागावजवळच्या एका गावातून आठ ते नऊ शेतकरी यासाठी इच्छुक असल्याने तेथेच प्रशिक्षणाचा वर्ग घेण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे सुशांत मोरे यांनी सांगितले. या प्रातिनिधिक उदाहरणावरून चाकरमानी आता शेतीच्या कामात गुंतून घेण्याचा विचार करीत असल्याचे पाहायला मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com