राजकीय आखाड्याचे वारसदारांना आकर्षण ; सोशल मीडियाद्वारे प्रभागांवर छाप

लुमाकांत नलवडे
Sunday, 25 October 2020

इच्छुक वारसांची मोर्चेबांधणी

पिढ्या उतरताहेत रणांगणात 

 

कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक केव्हा होईल हे निश्‍चित नाही; पण नगरसेविकांचे पती, मुलांनी मात्र प्रभागावर आपला वारसा सांगण्यास सुरवात केली आहे. डिजिटल फलक, वाढदिवस, फेसबुकसह सोशल मीडिया, छोटे-मोठे कार्यक्रम, कोरोना योद्धा अशा कामांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करीत आहेत. एकंदरीतच ‘वारस’ आपल्या प्रभागावर शिक्कामोर्तब करीत आहेत.
 

दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय वारसा चालत आला आहे. पक्ष कोणताही असो, मात्र आमदार, खासदार, मंत्री यांनी वारसांना पुढे आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याला पालिकेची निवडणूकही अपवाद नाही. पालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक २०२१ मध्ये होण्याचे संकेत मिळाले. अद्याप कोणतीही तयारी पालिकेने सुरू केलेली नाही. त्यामुळे निवडणूक केव्हा होईल, हे अद्याप अनिश्‍चित आहे. तरीही मिळेल त्या संधीचे सोने करण्याचे काम नगरसेवक, माजी नगरसेवक, त्यांची मुले, नगरसेविकांच्या पतींनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यात प्रभाग एकपासून ८१ पर्यंत ही प्रसिद्धीची लाट आता आली.

हेही वाचा- मंदिरे उघडा, श्रद्धांशी खेळू नका

कसबा बावड्यातील नगरसेवक अशोक जाधव यांचे चिरंजीव, माजी महापौर स्वाती यवलुजे यांचे पती, माजी महापौर जयश्री सोनवणे आणि माजी नगरसेवक हरिदास सोनवणे यांचे चिरंजीव, नगरसेवक भूपाल शेटे यांचे चिरंजीव आणि ते स्वतःही, माजी नगरसेवक रामदास भाले यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक बाबा पार्टे यांचे चिरंजीव, दीपक जाधव यांचे चिरंजीव आणि नगरसेवक मुरलीधर जाधव यांचे पुतणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. कोणी वाढदिवसाच्या निमित्ताने, तर कोणी कोरोना योद्धाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- खासदार सुनील तटकरेंवरील हक्कभंग प्रस्तावाचा मंडणगडात राष्ट्रवादीकडून निषेध

चित्र गुलदस्त्यात
दोन्ही प्रभागांत पती-पत्नी, मुलगा-वडील इच्छुक असल्याचे दिसून येते. मात्र, जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही, निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

मार्केटिंग सुरू
काहींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उमेदवाराच्या छबीमागे महापालिका इमारतीचे चित्र ठेवून भावी नगरसेवकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. कोरोनातही या ना त्या पद्धतीने मतदारांच्या दारात पोचण्याचे काम इच्छुकांनी केले. काहींनी नवरात्रोत्सवानिमित्त पर्यावरणपूरकचा नारा देत आपले ‘मार्केटिंग’ केले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal elections Impressions gained in a fluid global diffused