जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कोवीड योध्दा पुरस्कार वादात

सदानंद पाटील
Tuesday, 27 October 2020

कोल्हापूर ः राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या कोवीड योध्दा पुरस्कारासाठी वशिलेबाजी झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचारी संघटना करु लागल्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार वादात अडकला आहे. अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना डावलून काही नावे ही वशिल्याने दिली असल्याचा आरोप केला जात आहे. जर यात बदल झाला नाहीतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

कोल्हापूर ः राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या कोवीड योध्दा पुरस्कारासाठी वशिलेबाजी झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचारी संघटना करु लागल्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार वादात अडकला आहे. अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना डावलून काही नावे ही वशिल्याने दिली असल्याचा आरोप केला जात आहे. जर यात बदल झाला नाहीतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर या विषयावरुन आरोग्य विभागात गोंधळ झाला. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत ही यादी बदलण्याचे नियोजन करण्यात आले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी खडसावले. 
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोवीड नियंत्रण, उपचार, योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान या आठवड्यात केला जाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचीच शिफारस करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जी नावे पाठवण्यात आली आहेत त्यात पाच तालुका आरोग्य अधिकारी, सात वैद्यकीय अधिकारी, एक अधिक्षक, एक नोडल अधिकारी, आरोग्य सेविका एक, साथरोग तज्ञ एक, तंत्रज्ञ एक, विस्तार अधिकारी सांख्यिकी एक, सहा आरोग्य सहाय्यक, सहा आरोग्य सेवक, सेविका यांचा समावेश आहे. 
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्‍त अभियान संचालक डॉ.सतीश पवार यांनी 15 ऑक्‍टोबरला पत्र पाठवून कोवीडमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे कळवण्याचे आदेश दिले होते. ही नावे 19 ऑक्‍टोबरपर्यंत कळवणे आवश्‍यक होते. मात्र ही नावे खातरजमा न करता, परस्परच संगनमताने कळवल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. 

जिल्हा परिषदेच्या अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. त्यांना पुरस्कार न देता काही पुरस्कारार्थीची नावे ही वशिल्याने घातली आहेत. ही नावे रदद करुन प्रामाणिक अधिकाऱ्यांची नावे न घातल्यास आंदोलन केले जाईल. 
- वंदना मगदूम, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती. 
.... 
शासनाने कोवीड योध्दा पुरस्कारासाठी नावे मागवण्याचे पत्र 17 ऑक्‍टोबरला देत 19 ऑक्‍टोबरपर्यंत नावे देण्याची सुचना केली. दोन दिवसात सर्वांना कळवून ही नावे संकलित करणे अशक्‍य होते. तरीही तालुक्‍याशी संपर्क साधून नावे घेण्यात आली. मात्र आता याबाबत तक्रारी सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा चर्चा करुन नावे घेतली जात आहेत. कोणतीही वशिलेबाजी झालेली नाही. - डॉ.योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Health Mission's Kovid Warrior Award in dispute