वयाच्या ७७ वर्षी ही गार्डनिंगचा प्रचार आणि प्रसाराचा ध्यास घेणारी नवदुर्गा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

शशिकला राणे यांची पर्यावरणपूरक रोपे, खतनिर्मिती

कोल्हापूर : मोरेवाडीतील ७७ वर्षीय शशिकला राणे यांचा केमिकल सप्लायचा व्यवसाय आहे. संचारबंदीत मात्र तो बंद राहिला. घरी बसून करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मग त्यांनी गार्डनिंगच्या ज्ञानातून गार्डनिंगचा प्रचार व प्रसाराचा ध्यास घेतला आणि त्यातून गार्डनिंगचे टेक्‍निक विद्यार्थिनींना सांगायला सुरवात केली. विशेष म्हणजे त्याची नोंद मुंबईतल्या एन. एल. दालमिया महाविद्यालयाच्या लॉकडाउन डायरीत घेतली. एवढ्यावरच समाधान न मानता श्रीमती राणे यांनी घरात रोपटी तयार करून त्यांचे मोफतच नागरिकांना वाटपही केले.

राणे मूळच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या. काही वर्षे त्या एक्‍साईजमध्ये कामाला होत्या. तेथून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कापड विक्रीचा व्यवसाय केला. पुढे त्या केमिकल सप्लायर म्हणून कार्यरत झाल्या. अनेक कारखान्यांना त्या केमिकलचा आजही पुरवठा करतात. झाडू व फिनेलची एजन्सीही त्यांच्याकडे आहे. मुलगा सम्राट दिव्यांग असून, तो बंगळूरमधल्या संस्थेत कामाला आहे. संचारबंदीच्या काळात घरी स्वस्थ बसून राहणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी घरीच कंपोस्ट खत तयार करण्याची तयारी सुरू केली. त्याचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवले. एक टन कंपोस्ट खताची निर्मिती त्यांनी घरीच केली. विशेष म्हणजे त्यांनी खतासाठी कोणाकडून पैशाची मागणी केली नाही. 

हेही वाचा- मराठा आरक्षण समतेचा लढा ; लोकप्रतिनिधीनी एकत्र यावे -

पर्यावरण जागृतीचा भाग म्हणून त्यांनी ते मोफतच वाटप केले. त्याचबरोबर त्यांनी कालिकतहून २२ वर्षांपूर्वी आणलेल्या ‘एग्ज’ची (अंबा व फणस यांचे कॉम्बिनेशन असलेले झाड) रोपटी तयार केली. टोमॅटो, झेंडू यांची रोपटी परिसरातील 
नागरिकांना वाटली. मुंबईतल्या दालमिया कॉलेजमधील दोन विद्यार्थिनींना त्यांनी गार्डनिंगची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. ग्रीन पर्यावरण कॅंपेनद्वारे त्यांनी इन्स्ट्राग्रामवर गार्डनिंगसह कंपोस्ट खताचे व्हिडिओ अपलोड केले. कॉलेजच्या लॉकडाउन डायरीत त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्यांची मुलाखतही झाली. 
पर्यावरण रक्षण, गार्डनिंग, कंपोस्ट खतनिर्मिती यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राणे म्हणाल्या, ‘‘वेळेचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. मला गार्डनिंगची आवड आहे. मोफत रोपे वाटून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे मला आवश्‍यक वाटते.’’

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga special story by nandini narewadi