Navdurga Special : सात शस्त्रक्रिया होऊनही खंबीर एक ७४ वर्षीय ‘अन्नपूर्णा’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

७४ वर्षीय सुमन जोशी अनेक आजारांवर मात करत कार्यरत

कोल्हापूर : पंधरा वर्षांच्या काळात एक-दोन नव्हे, सात शस्त्रक्रिया होऊनही संचारबंदीच्या काळात त्यांच्या हाताला विश्रांती नव्हती. विविध अन्नपदार्थ, फराळ, स्वयंपाक बनविण्याच्या कामात त्या दंग होत्या. त्यांचं नाव सुमन शशिकांत जोशी. छंद जोपासत त्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनल्या आहेत. ७४ वर्षीय सौ. जोशी यांची ३५ वर्षांपूर्वी एक किडनी काढली. त्यानंतर त्यांच्यावर सात शस्त्रक्रिया झाल्या. १५ वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाने ग्रासले. त्यांनी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात केली. पुढे त्या विश्रांती न घेता कामाला उभ्या राहिल्या. सहा वर्षांपूर्वी त्या जिन्यावर पडल्या. पायात सळी घालावी लागली. पायाला प्लास्टर लावलेले असतानाही त्यांचे हात विविध पक्वान्ने करण्यात कार्यरत होते. 

त्यांच्याकडे अन्नपदार्थांची ऑर्डर द्यायला येणारी प्रत्येक व्यक्ती आश्‍चर्यचकित झाल्याखेरीज राहिली नाही. भारतीय पद्धतीचे सात्विक भोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय लाडू, करंजी, शेव, चकली, डिंक व हळिवाचे लाडू हे फराळाचे साहित्य करण्यातही त्या कमी नाहीत. न्यू बादशाही लॉज सहा वर्षांपूर्वी बंद झाल्यानंतर त्या आयटीआयजवळील अश्वमेध एन्क्‍लेव्हमध्ये राहायला गेल्या. संचारबंदीच्या काळातही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांचे काम सुरू होते. अनेक ऑर्डर्स त्यांना मिळतात. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो आणि रात्री साडेअकराला संपतो. या वेळेत घेतली तर दहा मिनिटांची विश्रांती; अन्यथा संपूर्ण दिवस विविध खाद्यपदार्थ करण्यात व्यग्र. 

हेही वाचा- कांद्याने आणले डोळ्यात पाणी : गाठली शंभरी , किरकोळ विक्री दुप्पट दराने -

सिनेकलाकारांशी आपुलकीचे नाते
त्यांच्या न्यू बादशाही लॉज व हॉटेलवर सिने-नाट्य कलाकारांची वर्दळ असायची. अनेक नावाजलेले कलाकार त्यांच्या हातच्या जेवणाचा आनंद घेऊन तृप्त झाले. अडचणीत असलेल्या कलाकारांसाठी जोशी कुटुंबीय जणू पालकच. अनेक कलाकार बादशाही लॉजमध्ये आल्यावर त्यांच्याशी आदरपूर्वक वागायचे. हे सर्व केवळ पैसे मिळवणे या उद्देशाने नव्हते, म्हणूनच शक्‍य झाल्याचे त्या सांगतात.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga special story by nandini narewadi kolhapur