करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दुसऱ्या दिवशी पराशरांना महाविष्णूस्वरूपात दर्शन' रूपात पूजा 

संभाजी गंडमाळे
Sunday, 18 October 2020

श्री अंबाबाईला  बारा तोळे सोन्याच्या ठुशी अर्पण 

कोल्हापूर: नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पराशरांना महाविष्णूस्वरूपात दर्शन या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांनी बारा तोळ्याची सोन्याची ठुशी अर्पण केली. या ठुशीची किंमत सहा लाख वीस हजार रूपये इतकी आहे. 

श्री. देसाई यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे दोन ठुशी सुपूर्द केल्या. दहा तोळ्याची ठुशी मुख्य मुर्तीसाठी तर दोन तोळ्याची ठुशी उत्सव मूर्तीसाठी अर्पण केल्याचे यावेळी देसाई कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, अंजली देसाई, अभिषेक देसाई, ऋतुजा देसाई, सचिव विजय पोवार, सहसचिव शितल इंगवले, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. 

हेही वाचा- दिलासादायक : कोल्हापुरात ९४ टक्के बेड रिकामे ; ४४४ जण कोरोनामुक्‍त -

दुपारी देवीची "पराशरांना महविष्णुस्वरूपात दर्शन' रुपातील पुजा बांधण्यात आली. धार्मिक ग्रंथामध्ये केलेल्या या रुपातील वर्णनानुसार पराशरांना महाविष्णूस्वरुपात देवीने दर्शन देवून त्यांच्या मनातील संशय भेदभाव दूर केला. त्यानुसार मुनी देवीला विष्णूस्वरुपिनी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व तिची अष्टकाने स्तुती करतात. या रुपामध्ये देवी जगाच्या पालनकर्त्याच्या रुपात भाविकांना दर्शन देते. देवी गरुडावर बसलेली असून तिच्या हातामध्ये शंख-चक्र अशी आयुधे असल्याचे श्रीपूजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी सांगितले.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri On the second day a pooja performed for Shri Ambabai a resident of Karveer in the form of Mahavishnu