
. कोल्हापूरातील जिल्हा परिषदेत उभारलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी त्या कोल्हापूरात आल्या होत्या.
कोल्हापूर: भाजपचे धोरण हे जनतेसाठीच नव्हे तर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसाठीही धोक्याचे आहे, अशा आशयाचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणाऱ्या कार्यकर्त्यां संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी भविष्यात अनेक जण भाजप पक्षाला रामराम ठोकतील, असा अंदाज वर्तवला. कोल्हापूरातील जिल्हा परिषदेत उभारलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी त्या कोल्हापूरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्किट हौऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी भाजपचे काही कार्यकर्ते पक्ष सोडून आपल्याकडे येत आहेत, याबाबत त्यांना विचारण्यात आले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपमध्ये दडपशाहीचे धोरण आहे. या धोरणाला कंटाळून अनेकजण तो पक्ष सोडत आहेत. त्या पक्षात दडपशाही आहे, हे मला माहित आहे. त्यामुळे भविष्यातही अनेकजणांनी हा पक्ष सोडला तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.
हेही वाचा- करवीर पोलिस उपाधीक्षकपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती
याशिवाय त्यांनी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. केवळ दिखावा करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आंदोलकांशी पोलिसाकडून चांगली वागणूक मिळत नाही. निधी वाटपावेळी केंद्राकडून महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही सूड भावनेचा दिसतो, अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी केले.