आता चुकीला माफी नाही ; कोल्हापुरच्या नव्या पोलीस अधीक्षकांचा सज्जड इशारा

राजेश मोरे 
Wednesday, 30 September 2020

आर्थिकसह सायबर फसवणुकीचे प्रकार रोखण्यावर आपला फोकस राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर : सर्वसामान्यांना सन्मानजनक वागणूक देऊन पोलिस प्रशासनाकडून असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. त्याचबरोबर जिल्ह्यातील गुंडगिरी व काळेधंदेवाल्यांना ठेचून काढू असा इशाराही नूतन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. आर्थिकसह सायबर फसवणुकीचे प्रकार रोखण्यावर आपला फोकस राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात आज पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बलकवडे म्हणाले, बोलण्यापेक्षा कृतीला भर देणे मला आवडते. लोकाभिमुख कारभाराला आपले प्राधान्य असेल. पादर्शक व विश्‍वास पात्र प्रशासन हा अजेंडा आहे. पोलिस यंत्रणा ज्यांच्यासाठी आहे त्या नागरिकांच्या प्रथम अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहीजेत. नागरिकांना सन्मानजनक वागणूक दिली जाईल. त्यांच्या अडचणी, समस्या समजावून घेतल्या जातील. त्यासाठी नागरिकांना पोलिस अधीक्षक कार्यालय अगर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची वेळ येऊ देणार नाही. त्या समस्या अडचणी स्थानिक पोलिस ठाण्याच्या पातळीवर सोडतील असे प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील. 

हेही वाचा - कोल्हापुरकरांसाठी दिलासादायक बातमी : रुग्णसंख्येत होतीये घट

गडचिरोलीत नक्षलग्रस्तांकडून, इतरत्र ठिकाणी गुंडांकडून पिळणूक केली जाते. तत्कालिन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारीवर चांगलीच वचक ठेवली होती. हे चांगले काम येथून पुढेही असेच सुरू राहील. जिल्ह्यातील गुंडगिरी काळेधंदेवाल्यांना ठेचून काढले जाईल. 21 व्या शतकातील पोलिसिंग बदलले आहे. आर्थिक व सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे प्रकार कमी करण्यावर फोकस केला जाईल. त्यासाठी लागणारे ज्ञान तांत्रिक कौशल्य आत्मसात केले जाईल. फोक्‍सो, विनयभंग, बलात्कार अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. याचा तपास महिला अधिकाऱ्यांना करावा लागतो. पण त्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढतो. तो कमी करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना तपासाबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. अशी प्रशिक्षित महिला कर्मचारी अधिकाऱ्यांना सहकार्य करतील. पोलिस कल्याण निधी चांगला ठेण्याचा प्रयत्न असेल. त्यातून कर्मचाऱ्यांना निवास, आरोग्य, मुलांचे शिक्षण विषयक प्रश्‍न सोडवून त्यांची मानसिकता व मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल असे बलकवडे यांनी सांगितले. 

चुकीला माफी नाही

कामाच्या ओघात होणारी चूक समजून घेता येईल. पण ठराविक उद्देश ठेऊन हेतूपुरस्कर पोलिसांकडून होणाऱ्या कृतीला माफी केली जाणार नाही. संबधितावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी स्वच्छ प्रशासनाबाबत सांगताना दिला. 

हेही वाचा -  कोल्हापुरच्या तरुणीचे कौशल्य ; टाकाऊ चिंध्यांपासून बनवली फॅब्रिक ज्वेलरी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new SP of kolhapur district said in today's press conference for to complete the expectations of citizens in kolhapur