
क्रीडा कार्यालयाने कंबर कसली
जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम; तालुका ते ऑलिम्पिकपर्यंतचे मार्गदर्शन
कोल्हापूर : तालुकास्तरावरील खेळाडूला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र बनवण्यासाठी क्रीडा कार्यालयाने कंबर कसली आहे. याअंतर्गत एखाद्या खेळाडूचा कल ओळखून त्या खेळाडूला योग्य मार्गदर्शनासह त्याच्या डाएटचा आराखडा बनवला जाणार आहे. प्रोग्रॅमची रचना करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही योजना येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी प्रारंभी क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि क्रीडा निरीक्षकांना याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
देशाचे खेळातील यश हे शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडूंवर अवलंबून असल्याचे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभा ओळखण्यासाठी नवीन टॅलेन्ट सर्च प्रोग्रॅमची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या कल्पनेतून हा प्रोग्रॅम बनवला जात असून त्यांच्यासोबत क्रीडा अधिकारी आणि क्रीडा निरीक्षक सहभागी आहेत. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील खेळाडूंसह शहरी भागातील खेळाडूंवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी तीन टप्प्यांची रचना बनवली आहे.
हेही वाचा- पोलिसांकडून ‘मुस्कान’ अंतर्गत ३२ बालके पालकांकडे स्वाधीन -
पहिला टप्पा
खेळाडूतील शारीरिक क्षमतेच्या अभ्यासासह त्याच्या मानसिक आरोग्य आणि स्थैर्याची चाचपणी केली जाणार आहे. यानंतर शरीराची रचना, ठेवण, वजन, उंची याच्या परिमाणाचा अभ्यास करून खेळाडूची चाचणी घेतली जाईल. चाचणीनंतर खेळातील कल आणि खेळाचा अंतिम प्रकार ठरवण्यात येईल.
दुसरा टप्पा
यात खेळातील प्रकाराची निश्चिती झाल्यानंतर आवश्यक मार्गदर्शनाबरोबरच योग्य व्यायाम, आहार देणे. याचा योग्य समतोल राखून आहाराची निश्चिती केली जाणार आहे. शिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जाण्यासाठीची मानसिकता निर्माण केली जाणार आहे.
तिसरा टप्पा
खेळाडूतील सामान्य खेळाचा विकास झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणे.
चांगले प्रशिक्षण आणि योग्य आहार उपलब्ध करून देणे तसेच विविध स्पर्धांत सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे.
ऑलिम्पिकसाठी पदकाची अपेक्षा करताना पदकासाठी खेळाडूंना तयार करणे अधिक महत्त्वाचे आहे. यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास ऑलिम्पिक पदकात देशाचे स्थान सर्वोच्च असेल.
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी
संपादन - अर्चना बनगे