लग्नातील हळद ही निघाली नव्हती अन् तिने लावला गळ्याला फास...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

गडहिंग्लजची घटना ; लग्नानंतर महिन्यातच आत्महत्या

गडहिंग्लज (कोल्हापूर) - महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतच तिचा विवाह झाला. लग्नातील अंगावर लावलेली हळद निघण्यापूर्वीच नवविवाहितेने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. संगीता राजकुमार कल्लोळे (वय 21) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, जरळी (ता. गडहिंग्लज) येथील संगीताचा विवाह गडहिंग्लजमधील राजकुमार कल्लोळे यांच्याशी 16 एप्रिलला झाला. लॉकडाऊन असल्याने विवाह मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने झाला होता. आता कुठे संसार फुलत असतानाच संगीताने अचानक जीवनयात्रा संपवण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. 19 मे रोजी घडलेल्या या घटनेने शहरासह जरळीत चर्चा सुरू आहे.

वाचा - हुक्केरीत छतासह पाळण्यात झोपलेले बाळ हवेत उडाले अन्...

पोलिसांनी सांगितले की, संकेश्‍वर रोडवर राजकुमार कल्लोळे यांचे दुमजली आहे. मंगळवारी (ता. 19) दुपारी जेवण करून संगीता झोपण्याच्या निमित्ताने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. सायंकाळचे पाच वाजले तरी ती उठून खाली का आली नाही, हे पाहण्यासाठी राजकुमार वरच्या मजल्यावर गेला. दरवाजाला आतून कडी होती. आवाज देऊनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे खिडकीतून पाहिले असता दुसऱ्या खोलीत छताच्या हुकाला साडी बांधलेली दिसली. त्यानंतर राजकुमार याने संगीताचे वडील बाबू दुंडगे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने घरी येण्यास सांगितले. ते आल्यानंतर त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कडी असल्याने धक्का मारून दरवाजा उघडला. त्या वेळी संगीता साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बाबू दुंडगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. हवालदार प्रशांत गोजारे अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newly married women no more incident in gadhinglaj