पारगड, तिलारीनगर, महिपाळगडवर नो एंट्री

सुनील कोंडुसकर
Wednesday, 17 June 2020

कोकण सीमेला संलग्न पारगड, तिलारीनगरचा  परिसर अत्यंत निसर्गसंपन्न. उंच टेकड्या आणि विस्तीर्ण दऱ्या यामुळे इथले निसर्ग सौंदर्य अवीट आहे.

चंदगड : तालुक्‍यात पारगड, तिलारीनगर, महिपाळगड, कलानंदिगड आदी महत्वाची पर्यटन केंद्र आहेत. दरवर्षी पावसाळ्यात इथे पर्यटकांचा महापूर येतो. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी या केंद्रांकडे जाणाऱ्या पर्यटकांना रोखले आहे. कोरोनाची एकूण परिस्थिती काय राहणार यावरच पर्यटकांना यावर्षीचा पावसाळा अनुभवायला मिळणार की, नाही हे निश्‍चित होणार आहे. 

कोकण सीमेला संलग्न पारगड, तिलारीनगरचा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न. उंच टेकड्या आणि विस्तीर्ण दऱ्या यामुळे इथले निसर्ग सौंदर्य अवीट आहे. पावसाळ्यात तर ते अधिक खुलते. टेकडीच्या माथ्यावर कोसळणारा पाऊस आणि दरीतून वाऱ्याच्या वेगाने वाहणारे धुक्‍याचे ढग हा नजारा डोळ्याचे पारणे फेडतो. पावसाचे पाणी कड्यावरून दरीत उडी घेणार त्याचवेळी दरीतून वर येणाऱ्या वाऱ्यामुळे त्याचे कारंज्यात होणारे रूपांतर तर बघण्यासारखे. समुद्रसपाटीपासून साडे सातशे मीटर उंचीच्या किल्ले पारगडावरून पावसाचे दर्शन खूपच मोहक.

तिलारीनगर म्हणजे तर प्रती महाबळेश्‍वर. उंचावरुन कोसळणारे धबधबे, धुक्‍याच्या दुलईत हरवलेली गावे, शेतात कष्ट करणारे कृषीवल असा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा. पूर्व भागात कर्नाटक सीमेवरील महिपाळगडावरुन पायथ्याचे विस्तीर्ण क्षेत्रफळ डोळ्यात सामावता येते. गडाच्या पायथ्याला सवतीचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यामुळेच तळ कोकणातील दोडामार्ग, सावंतवाडी पासून गोव्यापर्यंत आणि चंदगड,

आजरा, गडहिंग्लज पासून कोल्हापूर पर्यंत तसेच बेळगाव परीसरातील हजारो पर्यटक हा आस्वाद घेण्यासाठी या भागाला भेट देतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा, राज्य बंदी आहे. त्यामुळे बेळगाव, कोकण, गोव्यातील पर्यटकांना ब्रेक लागला आहे. गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याने स्थानिक पर्यटकांनाही मर्यादा आली आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पर्यटकांना आपल्या मनावर आवर घालावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Entry On Pargad, Tilarinagar, Mahipalgad Kolhapur Marathi News