"या' तालुक्‍यात यंदाही पाण्याचे "नो टेन्शन', दोन तलाव फुल्ल, तर चार तलाव 100 टक्केच्या दिशेने

अजित माद्याळे
Monday, 10 August 2020

गडहिंग्लज तालुक्‍यातील ग्रामीण भागाला वरदायिनी ठरणाऱ्या तालुक्‍यातील सहा लघु पाटबंधारे तलावातील पाणी साठ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.

गडहिंग्लज : तालुक्‍यातील ग्रामीण भागाला वरदायिनी ठरणाऱ्या तालुक्‍यातील सहा लघु पाटबंधारे तलावातील पाणी साठ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. यंदाच्या पावसाने आजअखेर नरेवाडी व वैरागवाडी हे दोन तलाव फुल्ल झाले असून उर्वरित तेरणी, करंबळी, येणेचवंडी आणि शेंद्री हे चारही तलाव शंभर टक्के साठ्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. यामुळे यंदाही पाण्याची चिंता नसल्याचे चित्र असले तरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीवाटपाचे नियोजन करावे लागणार आहे. 

दरवर्षी नरेवाडी तलावच शंभर टक्के भरतो. अलीकडील काही वर्षात उर्वरित तलावांमध्ये 70 ते 90 टक्केच्या आसपास पाणीसाठा होतो. परंतु, गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मात्र सारेच तलाव शंभर टक्के भरून वाहू लागले. आजऱ्यातील चित्री मध्यम प्रकल्पही गतवर्षी जुलैमध्येच भरला होता.

दरम्यान, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतीला डिसेंबर-जानेवारीपर्यंत फारसा पाण्याचा वापर करावाच लागला नाही. परिणामी साठा मुबलक राहिला. उन्हाळ्याच्या कालावधीत लघु पाटबंधारे तलावातील पाणीसाठ्याचे पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनामुळे शेती आणि पिण्यासाठी अखेरपर्यंत पाणी उपलब्ध झाले. उलट पावसाळा सुरू होण्यापूर्वी जूनला या तलावांमध्ये 25 ते 30 टक्के साठा शिल्लक राहिला. पाटबंधारे खाते आणि शेतकऱ्यांच्या समन्वयातून पाणी वापराचे नियोजन झाल्याने शिल्लक पाणी राहण्यास मदत झाली. 

दरम्यान, यंदा जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. जून, जुलै आणि आजअखेर तीन टप्प्यात पडलेल्या पावसाने या तलावांमध्ये पाणी साठू लागले. गेल्या आठवड्यातील जोरदार पावसाने तालुक्‍यात पहिल्यांदा नरेवाडी तलाव फूल्ल झाला. त्यानंतर वैरागवाडी तलावाने शंभर टक्केची पातळी गाठली. आजअखेर शेंद्री 93, करंबळी 89, तेरणी 85 आणि येणेचवंडी 88 टक्के भरला आहे. यामुळे आणखीन एखादा जोरदार पाऊस झाल्यानंतर हे तलाव शंभर टक्के भरण्यास कोणतीच अडचण राहणार नाही. यंदाही 

चित्री 89 टक्केवर 
निम्म्या गडहिंग्लज तालुक्‍याला वरदान ठरलेला आजऱ्यातील चित्री प्रकल्पाच्या साठ्यावर या भागातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. गतवर्षी हा प्रकल्प जुलैमध्येच भरला होता. आज सकाळी 8 वाजता या प्रकल्पात 1889 पैकी 1681 एमसीएफटी पाणीसाठा झाला असून साठ्याचे प्रमाण 89 टक्के आहे. प्रकल्प भरण्याचे प्रमाण 101.93 टक्के इतके होते. प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक सुरू असून लवकरच हा प्रकल्पही भरेल, असे शाखा अभियंता तुषार पोवार यांनी सांगितले. 

तलावांतील साठा, कंसात क्षमता (एमसीएफटीमध्ये) 
- नरेवाडी 78 (78) 
- वैरागवाडी 53 (53) 
- शेंद्री 61.87 (66) 
- करंबळी 90.97 (102) 
- तेरणी 103.76 (122) 
- येणेचवंडी 47.85 (55) 

संपादक - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Water Tension In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News