corona virus : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य 

अभिजित कुलकर्णी  
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रथम आयात  - निर्यात थांबली. त्यामुळे औद्योगिक कारणांसाठी होणारी वाहतूक अगोदरच ठप्प झाली होती. जनता कर्फ्यूमुळे आणि नंतर संचारबंदीमुळे जिल्हा बंदी आणि गाव बंदी घालण्यात आली. वाहने बाहेर पडू शकत नसल्याने पोलिस प्रशासनाला महामार्ग रोखावा लागला नाही.

नागाव (कोल्हापूर) : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल २०२० पर्यंत देशात लॉक डाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग पुढील वीस दिवस ठप्प राहणार आहे. पेट्रोल, डिझेल, धान्य, औषधे आदी अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य कोणतीही रहदारी महामार्गावरून सुरू नाही.  महामार्गाच्या इतिहासात हा सर्वात मोठा लॉक डाऊन समजला जात आहे.

राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे इतर प्रमुख राज्यमार्ग ही निर्मनुष्य झाल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुनसान वाटत आहे. रविवारी ( ता. २२ ) देशात जनता कर्फ्यू असल्याने महामार्गावरून वाहतूक करणारी वाहने ठीक ठिकाणी थांबविण्यात आलेली होती. त्यानंतर राज्य सरकारने ३१ मार्च पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली. परीणामी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहने जिथल्या तिथे थांबून आहेत. 

कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रथम आयात  - निर्यात थांबली. त्यामुळे औद्योगिक कारणांसाठी होणारी वाहतूक अगोदरच ठप्प झाली होती. जनता कर्फ्यूमुळे आणि नंतर संचारबंदीमुळे जिल्हा बंदी आणि गाव बंदी घालण्यात आली. वाहने बाहेर पडू शकत नसल्याने पोलिस प्रशासनाला महामार्ग रोखावा लागला नाही. तरीही कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा कागल येथील कोगनोळी टोल नाक्यावर कागलचे पोलीस, निपाणी ग्रामीण पोलीस व महामार्ग पोलीस यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अत्यावश्यक कारणांसाठी ठराविक नागरिक प्रवास करत असले तरी, टोल नाक्यावर त्यांची कसून चौकशी होते. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत संबंधितांची तपासणी करूनच त्यांना प्रवास करायला परवानगी दिली जाते. असाच बंदोबस्त किणी टोल नाका येथे ठेवण्यात आला आहे. दोन्ही टोल नाके ही जिल्हा प्रवेशाची ठिकाणे असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी २४ तास बंदोबस्त तैनात ठेवून बंदोबस्त ये जा करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणांशिवाय कोणीही महामार्गावर येण्याचे धाडस करताना दिसत नाही. महामार्गालगत असणाऱ्या गावांमध्ये स्थानिक पोलिसांमार्फत बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणांना पोलीस ताब्यात घेत आहेत. तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत टवाळखोर तरुणांबाबत पोलीस प्रशासनाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती होत आहे. पेट्रोल पंपावर  काही बंधने घालण्यात आल्यामुळे विनाकारण प्रवास करणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल मिळणे बंद झाले आहे. 

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी परवानगी असेल तर महामार्गावरून वाहने सोडण्यात येत आहेत. कोगनोळी व किणी हे महामार्गावरील दोन्ही टोल नाके सध्या जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदीची ठिकाणे बनली आहेत. 

-सूर्यकांत शिरगुप्पे, पोलीस उपनिरीक्षक - राष्ट्रीय महामार्ग पोलीस

संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवांची वाहतूक करण्यासाठीही पोलीस वाहने उपलब्ध होत नाहीयेत. जी वाहने उपलब्ध होत आहेत त्यांच्यावर अत्यावश्यक सेवेचा फलक लावूनच ही वाहने प्रवास करत आहेत.

-योगेश रेळेकर, उपाध्यक्ष - जिल्हा वाहतूक सेना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: not people Pune Bangalore National Highway