आता ग्राहकांना मिळणार "टेट्रापॅक' दूध  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

मुंबईच्या महानंद येथे टोण्ड दूधावर प्रक्रीया करुन टेट्रा पॅकमध्ये पॅकींग करण्यासाठी त्यांच्याशी करार केला आहे

कोल्हापूर - मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर "टेट्रापॅक' दूध बाजारात आणत असून हे दूध ग्राहकांच्या पसंतीला उतरेल असा विश्‍वास संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी व्यक्त केला. 

"गोकुळ' ने दूधामध्ये आणखीन एका नव्या रूपामध्ये म्हणजे "यु.एच.टी.ट्रीटेड होमोजीनाईज्ड टोण्ड' दूध नविन आकर्षक अशा टेट्रापॅकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्याचा विक्री शुभारंभ आज घटस्थापनेच्या शुभदिनी गोकुळ प्रकल्प येथे श्री. आपटे यांच्या प्रेरणेतून व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके यांच्या शुभहस्ते झाला. 

सध्या बाजारामध्ये गोकुळ फूल क्रीम व गाय दूधाची विक्री कोल्हापूर, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, बेळगांव, गोवा या ठिकाणी दररोज अंदाजे 12 लाख लिटर्स पर्यंत केली जात आहे. गुणवत्तेवर ग्राहकांचा प्रचंड विश्‍वास असल्याने गोकुळ दूधाबरोबर गोकुळ दुग्धजन्य पदार्थांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोठ्या शहरात ग्राहक ज्यांना त्यांच्या दैनंदीन कामकाजाच्या स्वरुपामुळे दररोज दूध आणणे शक्‍य होत नाही अशाप्रकारचे ग्राहक व मॉलमधून दैनंदीन वस्तु खरेदी करणारा ग्राहक यांच्या मागणीचा विचार करुन "गोकुळ' ने "टेट्रापॅक'मध्ये उपलब्ध करुन दिले आहे. मुंबईच्या महानंद येथे टोण्ड दूधावर प्रक्रीया करुन टेट्रा पॅकमध्ये पॅकींग करण्यासाठी त्यांच्याशी करार केला आहे. पहिल्या टप्प्यात 17 ऑक्‍टोंबरपासून मुंबई उपनगरे, ठाणे,रायगड व कोल्हापूर येथे हे दूध विक्रीसाठी उपलब्ध होईल. लवकरच पुणे व इतर जिल्ह्यामध्ये मागणीप्रमाणे ते उपलब्ध केले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

सध्या दररोज 25 हजार लिटर इतक्‍या दूधाच्या टेट्रापॅकिंगने सुरुवात करण्यात येणार आहे. हे दूध सुरुवातीस ग्राहकांच्या मागणीस्तव एक लिटर पॅकिंगमध्ये 64 रूपये इतक्‍या माफक किंमतीस ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 

हे पण वाचाप्रसंगी कर्ज काढून बळीराजाला मदत करू ; ग्रामविकास मंत्री

यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरूण डोंगळे, विश्‍वास जाधव, धैर्यशिल देसाई, पी.डी.धुंदरे, संचालिका सौ. अनुराधा पाटील, संचालक दिपक पाटील, बाळासो खाडे, उदय पाटील, अमरिशसिंह घाटगे, सत्यजित पाटील, बाबा देसाई,रामराज देसाई-कुपेकर,कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक गुणनियंञण समुद्रे, दुग्धशाळा चौधरी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now consumers will get Tetra Pack milk