esakal | ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली
sakal

बोलून बातमी शोधा

nuclear scientist Dr. Shankarrao Gowarikar memories for kolhapur

डॉ. शंकरराव गोवारीकर यांच्या निधनानंतर आठवणींना उजाळा

 

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा उजाळा मिळतो आहे. भारताचा पहिला इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आला आणि याच माणसाचे बालपण मंगळवार पेठेतील कोष्टी गल्लीत, तर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथील विद्यापीठ हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये झाल्याच्या आठवणी अनेकांच्या सांगितल्या. 


कोष्टी गल्लीत महादेव मंदिराच्या मागे नर्मदा निवासस्थान येथे गोवारीकर कुटुंबीय राहत. पदार्थविज्ञान आणि इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग विषयातील पदवी घेऊन डॉ. गोवारीकर यांनी आण्विक भौतिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि "पीएचडी' केली. त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील कामाला 1955 साली प्रारंभ झाला. ""आम्ही कोल्हापूरचे. वडील पाटबंधारे विभागात उपविभागीय अधिकारी होते. त्यांची दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे आम्हा कुटुंबीयांचा प्रवास सतत सुरू राहिला. आमच्यावर खऱ्या अर्थाने विज्ञानवादी संस्कार झाले ते कोल्हापुरातच'', असे डॉ. गोवारीकर नेहमी सांगत. दरम्यान, प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे ते काका होत. 

हेही वाचा-पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले, नवनाथ घोगरेंची बदली

डॉ. गोवारीकर यांचा प्रवास 
- भारताचा पहिला इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर विकसित केला 
- 1983 मध्ये चंडीगड येथील सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट्‌स ऑर्गनायझेशनचे (सीएसआयओ) संचालक 
- 1991 मध्ये निवृत्त झाल्यानंतर थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू 
- तेव्हाच्या पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन इन्स्ट्रूमेंटेशनचे अध्यक्ष 
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेचे सदस्य. 
- याच काळात भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे सदस्य व मुक्तांगण विज्ञानशोधिकेचे कार्यकारी अध्यक्ष.  

संपादन - अर्चना बनगे