सीपीआर मध्ये 'त्या' कोरोना बाधित वृद्धाचा झाला मृत्यू अन् मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी केला आग्रह...

शिवाजी यादव
शुक्रवार, 10 जुलै 2020

रत्नागिरीतील व्यक्ती एका खाजगी रुग्णालयात मेंदू विकारावर उपचार घेण्यासाठी दाखल होता.

कोल्हापूर - मेंदू विकारावर उपचार घेण्यासाठी राजापूर जि.रत्नागिरी येथून कोल्हापुरात आलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा आज सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता. त्यामुळे हा कोरोना सह अन्य गुंतागुंतीच्या आजारातून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

याबाबत वैद्यकीय सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रत्नागिरीतील व्यक्ती एका खाजगी रुग्णालयात मेंदू विकारावर उपचार घेण्यासाठी दाखल होता. मात्र, प्रकृती अधिक गंभीर असल्याने तेथील खाजगी रुग्णालयाने कोल्हापूरातील एका प्रसिद्ध मेंदू उपचार रुग्णालयाकडे त्यांना पाठवले होते. त्यानुसार गेल्या तीन दिवसापूर्वी ही व्यक्ती कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती याच वेळी त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने सीपीआर रुग्णालयात कडे पाठवण्यात आले.

वाचा - काळजी नको, उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळणार ऑनलाईन

त्यानुसार बुधवारी (ता.8) सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी त्यांची प्रकृती अधिक गंभीर होती त्यांच्या मेंदूला सूज आली होती. त्याचबरोबर मधुमेह, थायरॉईड व निमोनिया सदृश्य लक्षणे ही तीव्र होती. अशात कोरोना अहवाल ही पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

संबंधित मृत व्यक्तीला कोरोना असल्यामुळे वैद्यकीय खबरदारी घेऊन मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. तसेच अंत्यसंस्कार विषयी विशिष्ट सूचना देण्यात आल्या, मात्र नातेवाईक हा मृतदेह गावी नेण्यासाठी आग्रही राहिले. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेची पंचायत झाली अखेर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man who came to Kolhapur from Rajapur district Ratnagiri died at the CPR hospital today