इचलकरंजी : पंचगंगेच्या पात्रात एकजण बुडाला

ऋषिकेश राऊत
Friday, 22 January 2021

सध्या नदी पात्रात वाहते पाणी नसल्याने गटांगळ्या खात असलेल्या ठिकाणी शिंदे यांचा शोध सुरू केला.

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील पंचगंगा नदीवरती घरातील धुणे धुण्यासाठी आलेल्या कुटुंबातील एक व्यक्ती नदीत बुडाली. रविंद्र पांडुरंग शिंदे (वय 48, रा. राजीव गांधी नगर, यड्राव) असे त्यांचे नाव आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक पाणबुडे आणि अग्निशमन दलाच्यावतीने नदीत बुडालेल्या शिंदे यांना शोधण्याचे काम गेल्या चार तासापासून युध्द पातळीवर सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी रविंद्र शिंदे हे घरातील मोठे धुणे धुण्यासाठी आपल्या कुटुंबियांसमवेत पंचगंगा नदीवर आले होते. धुणे धूत असताना शिंदे हे पोहत नदी पात्राच्या मध्यापर्यंत गेले. अचानक ते गटांगळ्या खाऊ लागले. नदी पात्रात त्यांच्या नातेवाईकांना ते दिसेनासे झाले. नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केला. त्वरीत या ठिकाणी पोलिस दाखल झाले. अग्निशमन दल व स्थानिक पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. युध्द पातळीवर शिंदे यांना शोधण्याची मोहिम सुरू केली. सध्या नदी पात्रात वाहते पाणी नसल्याने गटांगळ्या खात असलेल्या ठिकाणी शिंदे यांचा शोध सुरू केला. मात्र गेल्या चार तासापासून त्यांना शोधण्यात यश आले नाही. नदी पात्रावर त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा - लग्नासाठी मुलगी पहाण्याला पुण्याला निघालेल्या कुंभार कुटूंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली

 

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person drawn in panchganga river found the help of fire brigade in kolhapur ichalkaranji