मुख्य कार्यकारी अधिकारी झाले संतप्त ; कागद दिले भिरकावून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

जिल्हा परिषदेतून... 
होगाडे प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश 
 
वित्त विभागाचे अधिकारी अडचणीत 

कोल्हापूर : वित्त विभागाच्या चुकीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पडलेल्या सहाय्यक लेखाधिकारी पी.बी.होगाडे व वरीष्ठा सहाय्यक श्रीपती सखाराम केरु प्रकरणी वित्त विभागाने खुलासा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले. दरम्यान या प्रकरणाची काही कागदपत्रे तपासल्यानंतर संतप्त झालेल्या मित्तल यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे अक्षरक्ष: कागदे भिरकटत खुलासा करण्यास सांगितले. याप्रकरणी आज विरोधी पक्ष नेते विजय भोजे व सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी श्री.मित्तल यांची भेट घेत या प्रकरणाची माहिती दिली. 

कागल, हातकणंगले, गगनबावडा आदी तालुक्‍यातील वार्षिक ताळेबंदात घोळ आहे. हा घोळ गेली 20 वर्षापासून अधिक वर्षापासून आहे. मात्र ज्यांनी हा घोळ घातला त्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मात्र वित्त विभागाचे अधिकारी हे विद्यमान अधिकाऱ्यांना व त्यातही ठराविक लोकांना टार्गेट करत आहेत. असेच टार्गेट त्यांनी होगाडे व केरु या कर्मचाऱ्यांना केले. इतर कर्मचाऱ्यांना अभय देवून, त्यांची बदली करुन या दोन कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोप भोजे व प्रा.मोरे यांनी केला. तर विद्यमान मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने व उपमुख्य लेखा अधिकाऱ्यांनी खूप त्रास देवून आम्हाला सेवानिवृत्त होण्यास भाग पडल्याचा आरोप होगाडे व केरु यांनी केला. तसेच एजंट कर्मचाऱ्यांमार्फत आता प्रकरण मागे घेण्यास विनंती केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा- शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश -

तगाद्याने घेतली स्वेच्छानिवृत्ती 
सन 1980-81 ते मार्च 99 व सन 2007-08 ते जुलै 2012 या कालावधीत कागल पंचायत समितीच्या वित्त विभागाने ताळमेळमध्ये घोळ केला. मात्र बदलीने या ठिकाणी सहाय्यल लेखाधिकारी पदावर आलेल्या पी.बी. होगाडे यांच्याकडे हा ताळमेळ दुरुस्त करण्याचा तगादा लावण्यात आला. मुळात श्री.होगाडे यांची कागल येथे बदली न होता मुख्यालयात होणार असताना वित्त विभागातील टोळक्‍याने त्यांची बदली कागल येथे केली. तसेच या ठिकाणी असताना त्यांच्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांनी दबाव आणल्याची तक्रारच श्री.होगाडे यांनी केली आहे. या त्रासाला कंटाळून होगाडे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. मात्र ज्यांनी हा त्रास दिला त्यांच्याविरोधात होगाडे व केरु यांनी दंड थोपटले आहेत. 

कागद भिरकावले 
श्री.होगाडे व श्री.केरु यांनी केलेला खुलासा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्य केला होता. मात्र ही माहिती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना सांगितली नाही. उलट तुमच्यावरच कारवाई होणार असल्याची भिती घातली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतली असल्याचे सदस्यांनी श्री.मित्तल यांच्या निदर्शणास आणून दिले. याबाबतची कागदपत्रे पाहून संतापलेल्या श्री. मित्तल यांनी ही कागदे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम यांच्याकडे भिरकावली असल्याचे श्री.भोजे यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to disclose in Hogade case