esakal | एकहाती सत्तेचा मार्ग ‘जनसुराज्य’साठी अवघड; कोल्हापूरातील दिग्गज नेत्यांचे पन्हाळ्यावर लक्ष

बोलून बातमी शोधा

Panhala Giristhan Municipal Council update marathi political news

पन्हाळगडाची मतदारसंख्या कमी असली तरी कोल्हापुरातील बहुतेक सर्वच नेत्यांचे लक्ष पन्हाळा पालिकेकडे वेधण्याची शक्‍यता आहे.

एकहाती सत्तेचा मार्ग ‘जनसुराज्य’साठी अवघड; कोल्हापूरातील दिग्गज नेत्यांचे पन्हाळ्यावर लक्ष
sakal_logo
By
आनंद जगताप

पन्हाळा (कोल्हापूर)  : सलग तीन वेळा जनसुराज्यशक्‍ती पक्षाच्या झेंड्याखाली असलेल्या पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेत या वेळी नगरसेवकांतील अंतर्गत कलहामुळे पुन्हा ‘जनसुराज्य’ला एकहाती सत्ता मिळविणे वाटते तितके सोपे नाही. पन्हाळगडाची मतदारसंख्या कमी असली तरी कोल्हापुरातील बहुतेक सर्वच नेत्यांचे लक्ष पन्हाळा पालिकेकडे वेधण्याची शक्‍यता आहे.

फ्लॅशबॅक    
अवघ्या अडीच ते तीन हजार लोकसंखेच्या परिमाणात पन्हाळगडी नगर परिषद बसत नाही. कसलेही उत्पन्न नाही. तरीही थंड हवेचे ठिकाण, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आणि महालाचे ठिकाण या कारणास्तव खास बाब म्हणून येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे १९५४ मध्ये ‘क’ वर्ग नगर परिषद स्थापन झाली. त्या वेळी येथे लोकनियुक्‍त सदस्य नव्हते. त्या वेळचे संबंधित प्रांताधिकारी पालिकेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि नगररचना अधिकारी, मामलेदार, पर्यटन मंडळाचे संचालक, हिलस्टेशन सुपरिटेंडंट हे सदस्य होते. नगर परिषदेची पहिली निवडणूक १९६७ मध्ये झाली. तेव्हापासून १९८० पर्यंत नगराध्यक्ष म्हणून मदनमोहन लोहिया यांनीच काम पाहिले. प्रभाकर भोसले, विजय पाटील यांनाही अधिक कार्यकाळ मिळाला. येथे स्थानिक गटा-तटातच निवडणुका झाल्या.

भोसले यांच्या कारकीर्दीनंतर मोकाशी गटाने प्रत्येकाला एक वर्ष नगराध्यक्षपद देण्याचा प्रयत्न केला. २००१ मध्ये नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याची टूम आली आणि त्यात विजय पाटील विजयी झाले. २००६ मध्ये ‘जनसुराज्य’ने ‘एंट्री’ केली. विजय पाटील, कमलाकर भोसले यांच्या स्थानिक गटात मनोमिलन करण्यात आमदार विनय कोरे यशस्वी झाले आणि मोकाशी गटालाही अस्तित्व टिकविण्यासाठी या झेंड्याखाली जाणे भाग पडले. कोरे यांनी पालिकेची निवडणूक बिनविरोध केली. २०११, २०१६ मध्येही ‘जनसुराज्य’चाच झेंडा पालिकेवर राहिला. गतवेळी मोकाशी गटाची ‘शाहू महाआघाडी’, भोसले, काशीद यांची पन्हाळा विकास आघाडी आणि सत्तारूढ ‘जनसुराज्य’ अशा तीन आघाड्यांत लढत झाली. 

सद्यस्थिती
आजमितीस सत्ता जरी ‘जनसुराज्य’च्या हातात असली तरी अलीकडच्या काळात पालिकेत अनेक कारणांवरून रुसवा-फुगवा वाढला आहे. पन्हाळ्याला पर्यायी मार्ग, शिवस्मारक, बोटॅनिकल गार्डन, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सुविधा, सुंदर पर्यटन नगर, वस्तुसंग्रहालय आदी योजना रेंगाळल्याच आहेत. शहरात ‘जनसुराज्य’बरोबरच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तयार झाले आहेत. साहजिकच, एकहाती सत्तेचे स्वप्न भंगण्याची शक्‍यता आहे. शहरात १७ प्रभाग असले तरी प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या अवघी १२५ ते १५० च्या दरम्यान आहे. यापूर्वी प्रभाग एक ते सातमध्ये प्रत्येकी दोन, तर प्रभाग क्रमांक आठमध्ये तीन सदस्यसंख्या असल्याने एकमेकांच्या साथीने निवडून येणे सोपे होते; पण आता आपापल्या प्रभागात सर्वांचाच कस लागणार आहे.

पुढे काय?
या वेळी प्रत्येक प्रभागातून उमेदवाराला आपली ताकद व स्वत:चे काम दाखविण्याची वेळ येणार आहे. साहजिकच, इच्छुकांना वरिष्ठ नेत्यांची गरज भासेल. त्यादृष्टीने आतापासून खलबते सुरू झाली आहेत; तर काही ठिकाणी निवडणुकीच्या आघाड्यात उतरण्याच्या अनुषंगाने शड्डूचे आवाज घुमू लागले. झालेल्या कामांचा लेखजोखा सुरू झाला आहे. आमदार विनय कोरे यांच्यासह माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या फेऱ्या वाढतील. 

घडलं... बिघडलं
  पालिकेलाही घराणेशाहीचा शाप
  ‘जनसुराज्य’च्या नगरसेविका                 यास्मिन मुजावर शिवसेनेत
  मोकाशी गट ‘जनसुराज्य’मधून                 बाहेर
  स्वच्छ सर्वेक्षणात देशात नाव 
  रखडलेली पाणीपुरवठा योजना सुरू
  इंटरप्रिटिशन सेंटर ताब्यात

पक्षीय बलाबल
  एकूण जागा : १७
  जनसुराज्य : १२
  शाहू आघाडी (मोकाशी गट) : ३ 
  विकास आघाडी (भोसले) : २ 
  नगराध्यक्षपद : जनसुराज्य

संपादन- अर्चना बनगे