
जीएसटी कायद्यातील जाचक अटींना विरोध करण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदमध्ये येथील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळून सहभाग नोंदवला.
गडहिंग्लज : जीएसटी कायद्यातील जाचक अटींना विरोध करण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदमध्ये येथील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळून सहभाग नोंदवला. या बंदला कडकडीत प्रतिसादही मिळाला. जीएसटीमधील जाचक व अन्यायी तरतुदी रद्द अथवा शिथिल कराव्यात, अशी मागणी या वेळी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली. शहरातील विविध 36 व्यापारी संघटनांचा बंदमध्ये सहभाग होता.
आज सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. एसटी सेवा सुरू होती. यामुळे बंद असला तरी शहरात तुरळक नागरिकांची वर्दळ सुरुच होती. बंदमुळे अनेकांची गैरसोय झाली. लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना बंदमुळे माघारी जावे लागले.
पान, चहा टपरी, फेरीवाल्यांपासून मोठ्या शोरुमपर्यंतची सर्व दुकाने कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी फेरी काढून बंदचे आवाहन करीत होते. बाहेर गावाहून भाजी विक्रीसाठी काही शेतकरीही आले होते. लक्ष्मी रोड परिसरात ते बसले होते. इतर सर्व व्यवहार बंद होते. मेडिकल, दवाखाने, पेट्रोल पंप सुरळीत सुरू होते.
दरम्यान, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी, जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, जीएसटी कर प्रणाली पूर्णत: गोंधळलेली आहे. तिच्यातील जाचक अटी अन्यायी आहेत. या तरतुदीमध्ये सुमारे 950 बदल झाले असून ते करतेवेळी व्यापारी संघटनांना विश्वासात घेतलेले नाही.
प्रत्येक दिवशी नवीन येणारे नियम पाळण्यातच वेळ जात असून व्यापार करणेही मुश्कील झाले आहे. दहा लाखांसाठी साडेतीन लाख कर, दंडाची रक्कम असू शकते काय, मात्र जीएसटीमध्ये असे होते. आणि जीएसटी भरल्याशिवाय आयटी रिटर्न भरू शकत नाही. अशा अनेक जाचक अटींना व्यापारी कंटाळला आहे. व्यापारी-उद्योजकांना नाहक त्रास होणार नाही यासाठी जीएसटीमधील अनेक नियम रद्द होऊन या कर प्रणालीत सुसूत्रता आणावी.
व्यापारी राजेश बोरगावे, उद्योजक सुनील चौगुले, प्रकाश मोरे, रामदास कुराडे, संतोष शिंदे, युनूस नाईकवाडे, राजेंद्र बस्ताडे, श्रीनिवास वेर्णेकर, गंधवाले आदींच्या शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार जीवन क्षीरसागर, जीएसटी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
संपादन - सचिन चराटी
kolhapur