किणीकरांनी पोलिस बांधवांना भरवला पुरणपोळीचा घास...

संजय पाटील
बुधवार, 25 मार्च 2020

गुढीपाडव्याच्या सणालाही त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत होते.

कोल्हापूर - पुणे बंगळूर महामार्गावरील किणी येथील पथकर नाक्यावर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, वैद्यकीय व राज्य राखीव पोलीस दलाचे पथक आपल्या परिवारापासून दूर राहून कर्तव्य बजावत आहे.या अधिकारी व कर्मचाऱ्यांना किणी (ता. हातकणंगले) येथील नागरिकांनी पुरणपोळीचा आपुलकीचा घास भरवुन माणुसकीचे दर्शन घडविले.महापुराच्या संकटाला सामोरे जाऊन अवघे सहा महिनेही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोरोनाचे संकट आज उभे आहे. 

पुणे बंगळूर महामार्गावरील किणी पथकर नाक्यावर महापुरामध्ये थांबलेल्या वाहनधारकांना किणीकरांनी जेवणाची मोफत सोय करून दिली होती. याचाच एक भाग म्हणून आज  उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे. यासाठी स्थानिक पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस आणि आरोग्य पथकाचे सुमारे ४० कर्मचारी रात्रंदिवस आपली सेवा देत आहेत.

वाचा - खायला कोंडा अन्‌ निजेला धोंडा...!  

आज प्रत्येक घरात साध्यापद्धतीने का असेना पण हिंदू धर्मातील पवित्र व महत्वाचा असणारा गुढीपाडव्याच्या सण साजरा झाला.
किणीकरांनी पथकर नाक्यावर स्थानिक पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस आणि आरोग्य पथकाचे सुमारे ४० कर्मचाऱ्यांना
पुरणपोळी, श्रीखंड, भाजी, भात, आमटी असं भोजन दिले.

गुढीपाडव्याच्या सणालाही त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या या देशबांधवांना किणी येथील काही युवकांनी पुरणपोळीचे जेवण दिले. यामध्ये  शांतिकुमार पाटील, नारायण कुंभार,अरंहनाथ पाटील, अॅड. ऋतुराज पाटील, नितीन लाले, समोद पाटील, अवि जयगोंडा, सुनील बांबवडे यांनी पुढाकार घेत प्रत्येक घरातून पोळी, भात, आमटी व श्रीखंड देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. किणीकरांच्या या आपुलकीच्या ऋणात सेवा देणारे सुमारे ४० कर्मचारी तृप्त झाले. या उपक्रमाचे कौतुक झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people help to policemen in kini kolhapur