टण टण वाजलं, मटण शिजलं...! कोल्हापुरात जनता कर्फ्यूच्या आधी हा बेत... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

कोल्हापुरात जनता कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला मटण दुकानात तोबा गर्दी... 

कोल्हापूर - टण टण वाजलं, मटण शिजलं' अशी गाणी खऱ्या अर्थानं धुमाकूळ घालतात ती कोल्हापुरातच. चोखंदळ खवय्यांच्या या शहरात आज जनता कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला मटण दुकानात अक्षरशः तोबा गर्दी उडाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गर्दी कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गर्दीपुढे मटण विक्रेत्यांनाही काहीच करता आले नाही, असे चित्र दुपारनंतर बऱ्याच मटण दुकानांत अनुभवायला मिळाले. रांग लावा, असे आवाहन विक्रेत्यांकडून केले जात होते. मात्र, तरीही लवकर मटण मिळावे, यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू होती. 

कोल्हापूर आणि मांसाहार हे एक अतूट समीकरण. बुधवार आणि रविवार म्हणजे तर मांसाहारींचे हक्काचे वार. साहजिकच उद्या (रविवारी) शहरात कुठेही मटण मिळणार नसल्याने आज दुपारपासूनच मटण दुकानात गर्दी होवू लागली. चिकनचा दर आज चाळीस ते ऐंशी रूपये किलो होता. चिकन सेंटरवरही गर्दी होती. मात्र, चिकनमुळे कोरोना होतो, हा गैरसमज अजूनही असल्याने चिकनपेक्षाही मटणालाच मोठी मागणी राहिली. सायंकाळी चारनंतर गर्दी वाढतच गेल्याने विक्रेत्यांचीही भंबेरी उडाली. मटण घरी आल्यानंतर आज ते फक्त उकडून ठेवण्यावर अनेकांनी भर दिला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in the shop to buy mutton in kolhapur