दुगूनवाडी-बटकंणगले रस्ता खड्ड्यात

गणेश बुरुड
Thursday, 26 November 2020

दुगूनवाडी ते बटकंणगले या सहा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

महागाव : दुगूनवाडी ते बटकंणगले या सहा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

हा रस्ता गडहिंग्लज-चंदगड राज्य महामार्गाला बटकंणगलेमध्ये मिळतो. या रस्त्यावरून दुगुनवाडी, मुंगूरवाडी, जांभूळवाडी, मा. सावतवाडी, हिडदुगी, कडाल, हलकर्णी व कर्नाटक भागातील लोकांची वर्दळ असते. आजरा, नेसरी, चंदगड व कोकणाकडे जाण्यासाठीही भागातील लोक या रस्त्याचा वापर करतात. काही वर्षापूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण व खडीकरण करण्यात आले होते. त्यानंतर देखभाल व दुरुस्तीअभावी त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

रस्त्याच्या मध्यभागी उंचवटा व संपूर्ण रस्त्याला खड्डे पडल्याने वाहन चालवणे, लहान मुलांना, गरोदर स्त्रिया, रुग्ण तसेच वृद्धांना या रस्त्याने घेऊन जाणे धोक्‍याचे झाले आहे. रस्ता खराब असल्याने खासगी वाहनचालक या भागातील नागरिकांकडून जास्त भाडे आकारत आहेत, तर काही वाहनचालक भाडे नाकारत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. लोकप्रतनिधी व संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

रस्त्याचे डांबरीकरण करावे
दुगुणवाडी ते बटकंणगले या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. सहा किमी प्रवासासाठी फारच वेळ वाया जातो. कायम वाहतुकीचा रस्ता असल्याने संबंधित खात्याने लवकरात लवकर लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण करावे. 
- प्रवीण सरोळकर, जांभूळवाडी

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits On Dugunwadi-Batkanangale Road Kolhapur Marathi News