आता प्लॅस्टिकचीच चलती; मटणाला डबा आणि पालेभाजीसाठी कापडी पिशवी नेण्याचा पडला विसर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020


प्लॅस्टिक मुक्तीचा विसरः पार्सलसाठी सर्रास वापर 

कोल्हापूर:  वर्षाच्या सुरवातीला प्लॅस्टिक विरोधी कारवाई सुरू झाल्यानंतर तातडीने कॅरीबॅगची विक्री बंद झाली. कोव्हिडच्या काळात महापालिकेची यंत्रणा अन्य कामात व्यस्त झाली. अनलॉक सुरू झाला तरिही कोव्हिडचे काम काही थांबेना. व्यापारी दुकाने, आस्थापना सुरू झाल्या. मटण, चिकन दुकाने, चायनीज सेंटर सुरू झाले तसा प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला. मटणाला डबा आणि पालेभाजीसाठी कापडी पिशवी नेण्याचा अल्पावधीतच विसर पडला. 

31 मार्चअखेर शहर प्लॅस्किटमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला होता. त्यासाठी जानेवारीपासूनच जनजागृती मोहिम सुरू झाली. एका बाजूला जनजागृती मोहिम आणि दूसऱ्या बाजूला दंडाची कारवाई सुरू झाली. पालिकेचे पथक कधी येईल आणि कारवाई होईल याचा नेम नसल्याने प्लॅस्टिक विक्री बंद झाली. मटण तसेच चिकनच्या दुकानातही कॅरीबॅगला बंदी आहे कृपया येताना डबा आणावा असे बोर्ड लिहले गेले. भाजी मार्केटमध्येही कॅरीबॅगचा वापर बंद झाला. कापडी पिशवी सोबत घेऊन येण्याची सवय हळूहळू अंगवळणी पडू लागली. प्लॅस्टिक मुक्तीचे चांगले पाऊल पडत असताना मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन सुरू झाला. नंतर दीड महिन्यात व्यापारी आस्थापना बंद झाल्याने प्लॅस्टिकचा वापर कमी झाला. चार मे नंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले. जून ते ऑक्‍टोबर सर्वच आस्थापना सुरू झाल्या. दसरा. दिवाळीला खरेदीची धूम झाली. महाद्वार रोडवर सणासुदीच्या काळातील तसेच दर शनिवारी रात्री असणारे चित्र अंगावर काटा उभा राहतो. मुख्य रस्त्यावर प्लॅस्टिकचा खच पडलेला असतो. 

हेही वाचा- कोल्हापूरातील वाहतूक मार्गात बदल; असा आहे पर्यायी मार्ग -

महापालिकेने कारवाई थांबविल्याने प्लॅस्टिकचा वापर वाढत गेला. आज कुठेही सहजपणे कॅरीबॅग तसेच प्लॅस्टिक पिशवी उपल्बध होऊ लागली आहे. कारवाईची कोणालाही भिती राहिलेली नाही. हॉटेलमध्ये पार्सलसाठी सर्रास प्लॅस्टिकचा वापर होऊ लागला आहे. शहरात रात्री नजर पडेल तिकडे बिर्याणी तसेच चिकन 65 च्या गाड्या उभ्या आहेत. प्लॅस्टिक पिशवीचा वापर झाल्यानंतर एकतरी ती गटारीत जाते अथवा कोंडाळ्यात, पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरासाठी पाच हजारांचा दंड आहे, दूसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास दहा आणि तिसऱ्यांदा 25 हजार रूपये इतकी दंडाची आकारणी होती. महापालिका पथकाकडून सध्या पावती फाडण्याचे काम सुरू आहे. मात्र प्लॅस्टिक उत्पादन तसेच विक्रीस बंदी असूनही बेसुमार वापर सुरू आहे त्यामुळे 2020 ला प्लॅस्टिक मुक्त शहर करण्याचा संकल्प पूर्ण होणार नाही हे ही निश्‍चित आहे. 

बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यावर महापालिकेने विविध पथकांच्या माध्यमातून कडक कारवाई सुरू केली आहे. येत्या आठवडाभरात कारवाई अधिक तीव्र होणार आहे. पर्यावरणारणाची हानी टाळायची असेल तर प्लॅस्टिकचा वापर टाळावा 
निखील मोरे, उपायुक्त  

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plastic release Forget all people start use for plastic bag