गोकूळबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर पी.एन-मुश्रीफ बैठक

PN-Mushrif meeting after court decision on Gokul
PN-Mushrif meeting after court decision on Gokul

कोल्हापूर ः राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती असताना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यावरील निकालानंतर बैठक घेण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी. एन. पाटील यांच्यात आज झालेल्या भेटीत झाला. 
दरम्यान, "गोकुळ'ने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी उद्या (ता. 2) असून या निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 
जिल्हा बॅंक व "गोकुळ' चे राजकारण एकमेकाला पूरक आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी श्री. मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांना आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांचे सहकार्य हवे तर "गोकुळ' च्या निवडणुकीत श्री. मुश्रीफ आपल्यासोबत रहावेत, यासाठी श्री. पाटील व श्री. महाडीक प्रयत्नशील आहेत. या पार्श्‍वभुमीवर कोल्हापुरात गेल्या आठवड्यात मुश्रीफ-पीएन यांची प्राथमिक चर्चा झाली. सविस्तर चर्चा आज मुंबईत करण्याचे ठरले होते. 
दरम्यानच्या मुदतीत शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती दिली. पण उच्च न्यायालयाच्या 10 फेब्रुवारीच्या आदेशाचा आधार घेत "गोकुळ' ची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला. प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात "गोकुळ' ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी उद्या (ता.2) आहे. याबाबत आज मुश्रीफ-पी. एन. यांची मुंबईत अधिवेशना दरम्यान भेट झाली. जिल्हा बॅंकेची निवडणूक यापुर्वीच पुढे गेली आहे तर "गोकुळ' ने प्रक्रिया सुरू ठेवण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निर्णय काय होतोय ते पाहून पुन्हा बैठक घ्यावी असे या दोघांत ठरले. त्यामुळे आजची या दोघांची बैठक काही वेळातच संपली. 

निवडणूक लागलीच तर... 
उच्च न्यायालयाच्या 10 फेब्रुवारीच्या आदेशात स्पष्टता नाही. "गोकुळ' ची निवडणूक घ्यावी, असे आदेशात कोठेही म्हटलेले नाही. या याचिकेत सहाव्या क्रमांकावर "गोकुळ' प्रतिवादी आहे. तसा आदेशातही कोठे उल्लेख नाही. या मुद्यावर "गोकुळ' ने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने ही निवडणूक घेण्याचे आदेश दिले तर मात्र "गोकुळ' च्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. संचालकांतील फूट टाळण्यासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. जिल्हा बॅंक व "गोकुळ' ची निवडणूक एकदम लागली तर तडजोडही यशस्वी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच उद्याच्या निकालाबाबत उत्सुकता आहे. 

-संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com