esakal | कोल्हापूर : इचलकरंजीत काँग्रेस पक्ष लवकरच करणार मोठा राजकीय धमाका

बोलून बातमी शोधा

political changes ichalkaranji corporation election in kolhapur}

आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर या घडामोडीला महत्व येणार असून शहरातील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : इचलकरंजीत काँग्रेस पक्ष लवकरच करणार मोठा राजकीय धमाका
sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरातील काँग्रेस पक्ष लवकरच मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहे. तीन नगरसेवकांसह अनेक माजी नगरसेवक काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु आहे. आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर या घडामोडीला महत्व येणार असून शहरातील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

गेली अनेक वर्षे शहरात काँग्रेस पक्षावर आवाडे यांचे एकतर्फी वर्चस्व होते. काँग्रेसमधून जेष्ठ नेते शरद पवार बाहेर पडल्यानंतरही आवाडे यांनी राष्ट्रवादीसोबत न जाता काँग्रेसलाच साथ दिली होती. त्यामुळे शहरात नेहमीच काँग्रेस भरभक्कम राहिली आहे. तथापि, गेल्या विधान सभा निवडणूक होण्यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यामुळे भरभक्कम असलेला काँग्रेस पक्ष एकदमच कमकुवत झाला. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच सक्षम कार्यकर्ते या पक्षात उरले.

हेही वाचा - साहेब! पावती झाली की, दंड भरलाय, शहरातूनच जाणार! ; अवजड वाहनांमळे वाहतुक कोंडी -

मागील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा फारसा प्रभाव दिसला नाही. मात्र अलीकडे पून्हा एकदा शहरात पक्षाची बांधणी सुरु करण्यात आली आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाचा विचार पून्हा एकदा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात झालेत. सध्या शहरात या पक्षाचे नेतृत्व नगरसेवक संजय कांबळे, राहूल खंजीरे, शशांक बावचकर यांच्याकडे आहे. यातील खंजीरे यांचे संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.

या वर्षाअखेरीस पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यामुळे हळूहळू अंतर्गत राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा राजकीय धमका करण्यात काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. लवकरच तीन विद्यमान नगरसेवकांसेवकांसह अनेक जेष्ठ माजी नगरसेवक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत संपर्क करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लवकरच शहरातील राजकारणात मोठ्या घडामोडीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हेही वाचा -  इचलकरंजीत अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई ; बड्या लोकांची नावे? -

काँग्रेस पक्षाला मिळणार उभारी

लवकरच पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत. या निमित्ताने शक्ती प्रदर्शन व पक्ष वाढीसाठी मोठी संधी काँग्रेससमोर असणार आहे. जर शहरातील आणखी काही प्रभावी नेतेमंडळींचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास पक्षाला नजिकच्या काळात पून्हा उभारी मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम