esakal | कर्नाटकला जोडणाऱ्या दुंडगे-चनेट्टी रस्त्याची दुरावस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Poor Condition Of Dundage-Chanetti Road Kolhapur District Kolhapur Marathi News

चंदगड तालुक्‍याच्या पूर्व भागातील दुंडगे ते चनेट्टी फाटा (ता. चंदगड) या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन वर्षापासून रस्त्याच्या दुरूस्ती मागणी होत आहे. ऊस वाहतुकदारांनी गेल्यावर्षी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.

कर्नाटकला जोडणाऱ्या दुंडगे-चनेट्टी रस्त्याची दुरावस्था

sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : तालुक्‍याच्या पूर्व भागातील दुंडगे ते चनेट्टी फाटा (ता. चंदगड) या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन वर्षापासून रस्त्याच्या दुरूस्ती मागणी होत आहे. ऊस वाहतुकदारांनी गेल्यावर्षी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता, पण अद्याप रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. कामेवाडी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचेही बांधकाम मजबूत होण्याची गरज आहे. प्रशासनाकडून हा प्रश्‍न बेदखल झाल्याची भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. कोवाड ते कामेवाडी मार्गे दड्डी असा हा कर्नाटकला जोडणारा रस्ता आहे.

साधारण 10 किलोमीटरचे रस्त्याचे अंतर आहे. कोवाडपासून दुंडगेपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे, पण दुंडगेपासून चनेट्टी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद होत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण उधळून गेले आहे. चिंचणे ते राजगोळी परिसरात वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्याची ही अवस्था झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दड्डी मार्गे कोल्हापूरला जाण्यासाठी तालुक्‍यातील प्रवाशांना हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. तसेच हेमरस साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी 60 टक्के वाहने याच रस्त्यावरुन ये-जा करतात. 

गेल्या वर्षी महापूरात कामेवाडी बंधाऱ्याला जोडलेल्या या रस्त्याचा भराव पाण्यातून वाहून गेला. तब्बल दोन महिने वाहतूक बंद झाली. अखेर स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्‍टरने माती टाकून तात्पुरता रस्ता सुरु केला असला तरी या रस्त्याच्या मजबूतीकरणाची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काम लवकर सुरु करावे, अशी मागणी होत आहे. 

माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेणार
दुंडगे ते चनेट्टी फाट्यापर्यंतचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. दोन वर्षापासून या रस्त्याची साधी डागडूजी सुध्दा केलेली नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून या रस्त्यावर नेमका किती निधी मंजूर झाला व किती खर्च झाला आहे. याची माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेणार. 
- प्रा. दिपक पाटील, स्वाभिमानी, शेतकरी संघटना 

संपादन - सचिन चराटी