कागलकर 'असे' थोपवत आहेत कोरोनाला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

जिल्ह्यात आणि राज्यात आरोग्य सेवेत नेहमीच अग्रेसर राहिलेल्या, कागल पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या समोर कोल्हापूर वेशीत हा निर्जंतुकीकरण कक्ष उभा केला आहे. नगरपरिषदेच्या बागांमधील झाडांना पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंकलरच्या वापराविना पडून असलेल्या टाकाऊ पाईप, मोटर आणि पाण्याच्या टाकीचा वापर यासाठी करण्यात आला आहे.

कागल : कागल शहरामध्ये येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती आणि वाहन निर्जंतुकीकरण होऊन जाण्यासाठी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर वेशीजवळ पालीकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  हा कक्ष उभा केला आहे. विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही खर्च न करता बागेतील टाकाऊ वस्तूपासून हा निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 

प्रत्येक गल्ली, शहर आणि उपनगरांची स्वच्छता ठेवण्याचे काम आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकांचे आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही हे काम प्रामाणिकपणे करत आहेत. जीवघेण्या कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात हे कर्मचारी जीव धोक्यात घालून स्वच्छतेच्या कामात गुंतलेले आहेत. 

जिल्ह्यात आणि राज्यात आरोग्य सेवेत नेहमीच अग्रेसर राहिलेल्या, कागल पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या समोर कोल्हापूर वेशीत हा निर्जंतुकीकरण कक्ष उभा केला आहे. नगरपरिषदेच्या बागांमधील झाडांना पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंकलरच्या वापराविना पडून असलेल्या टाकाऊ पाईप, मोटर आणि पाण्याच्या टाकीचा वापर यासाठी करण्यात आला आहे. वीस स्प्रिंकलर कारंजांचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. तीन हजार लिटर पाण्याच्या टाकीला हे मोटर बसवून त्यास कारंजाची पाईप जोडण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीत सोडियम हायपोक्लोराईडचे द्रावण टाकण्यात आले आहे. या कक्षातून शहरात प्रवेश करणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनावर हे द्रावण फवारण्यात येत आहे. १४ एप्रिल पर्यंत रोज सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत हा कक्ष सुरू राहणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. 

हेच ते कारागीर

मुख्याधिकारी पंडीत पाटील यांच्या प्रोत्साहनाने आरोग्य निरिक्षक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ बघून निर्जंतुकीकरण कक्ष बनविण्यासाठी बादल कांबळे, संदीप गाडेकर, करण कांबळे, रणजित साठे, अमोल गोनुगडे, नितीन कांबळे, प्रथमेश कांबळे
 यांनी परिक्षम घेतले आहे. 

कर्नाटकातील तिरूपूर जिल्ह्यातील अशा पध्दतीचा व्हिडिओ पाहण्यात आला. त्यावरून कल्पना सुचली. पालीकेचे कारागीर कर्मचाऱ्यांनी साथ दिल्याने हा उपक्रम यशस्वी झाला. शहराच्या हद्दीत कोरोनाला येऊ द्यायचे नाही यासाठी प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्जंतुकीकरण कक्ष उभा केला आहे. या माध्यमातून शहरात प्रवेश करणारी व्यक्ती, वाहन तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत असले कर्मचारी वाहने यांचे  निर्जंतुकीकरण व्हावेत हाच उद्देश आहे. 

- नितीन कांबळे, आरोग्य निरीक्षक

या निर्जंतुकीकरण कक्षाच्या माध्यमातून पालिकेने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी वेगळी उपाययोजना केली आहे. शंभर टक्के लॉक डाऊनच्या काळात शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व इतर व्यक्तींसह वाहनांचेही निर्जंतुकीकरण या कक्षात केले जाणार आहे. हा वेगळा उपक्रम चांगला व अनुकरणीय आहे. कोरोना रोखण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहे. 
-पंडीत पाटील, मुख्याधिकारी  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prepare sterile room kagal kolhapur corona corona virus