"प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य छत्रपती घराण्याच्या व बहुजनांच्या भावना दुखावणारे"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

समरजितसिंह घाटगे; सलोखा जपणे सर्वांचे कर्तव्य

 

कागल  (कोल्हापूर)  : छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत पिराजीराव घाटगे महाराज, छत्रपती राजाराम महाराज व घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपसांतील संबंध पाहता ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ते वक्तव्य हे छत्रपती घराण्याच्या व बहुजन समाजाच्या भावना दुखावण्यासारखे आहे. त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, असे मत छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी 
व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘‘यापुढे अशी विधाने करताना त्यांनी गांभीर्याने विचार करावयास हवा. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यावर बोलताना आपल्या वारसांवर जे संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवून बहुजन समाज एकजूट राखून त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करणे ही जबाबदारी सर्वांवर आहे.’’

हेही वाचा- परीक्षार्थींत कहीं खुशी कहीं गम ; आता करायचं काय ? -

ते म्हणाले, ‘‘छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध होते. हेच ऋणानुबंध तीन पिढ्यांमध्ये बहुजन  समाज सामाजिक एकात्मतेच्या भावनेने जोपासत आहे. अशा स्थितीमध्ये बहुजन समाज एकसंध राहील, हे ॲड. आंबेडकर यांनी अशी विधाने करण्यापूर्वी जाणणे अपेक्षित आहे. याबाबत त्यांनी आपले मत जाहीरपणे व्यक्त करण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर चर्चा केली असती तर बरे झाले असते. याउलट त्यांनी दोन्ही घराण्यांमधील सलोख्याचे संबंध अबाधित राखून सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश द्यावयास हवा होता.’’

संपादन -अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Chhatrapati Shahu Sugar Factory Samarjit Singh Ghatge comment for Adv Prakash Ambedkar