पोल्ट्रीचा फटका मक्क्याला

दीपक कुपन्नावर
Thursday, 25 June 2020

मक्‍याला यंदा नीच्चांकी भाव मिळत आहे. सध्या क्विंटलचा 1250 ते 1300 रुपये असा दर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर निम्म्याने उतरला आहे.

गडहिंग्लज : मक्‍याला यंदा नीच्चांकी भाव मिळत आहे. सध्या क्विंटलचा 1250 ते 1300 रुपये असा दर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर निम्म्याने उतरला आहे. कोरोनाचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे. त्यामुळेच पोल्ट्री उद्योगाकडून मक्‍याला मागणी नसल्याने दर पडले आहेत. गेल्या चार वर्षांतील हा सर्वात कमी दर असल्याने मक्का उत्पादक हवालदिल झाले आहेत. 

दरवर्षी मार्च ते मे महिन्यात मक्‍याची आवक वाढते. मुख्यतः उसाच्या खोडव्यात मका पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तुलनेत लगतच्या कर्नाटक सीमा भागात मुख्य पीक म्हणूनच मक्‍याची लागवड केली जाते. वर्षातून तीनदा मक्‍याचे पीक घेणारे शेतकरी कर्नाटकात आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांचा पारदर्शक व्यवहार आणि विश्‍वासार्हता यामुळे सीमा भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात मका या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. त्यामुळे वर्षभर येथील घाऊक व्यापाऱ्याकडे मक्‍याची आवक सुरू असते. 

गेल्या दशकभरात या उपविभागात पोल्ट्री उद्योजकांची संख्या वाढली आहे. मका हे कोंबड्यांसाठी मुख्य खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात मक्‍याला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळेच दरही दुपट्टीने वाढला. त्यामुळे मका पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढली. 

फेब्रुवारीपासून पोल्ट्री उद्योग कोरोनाच्या दुष्टचक्रात गुरफटला गेला. अनेकांनी वाहतूक खर्चही भागेना म्हणून कोंबड्या नाईलाजाने पुरुन टाकल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक पोल्ट्रीधारकांनी व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले. त्यामुळेच मक्‍याला मागणी घटली. 

उचलच नसल्याने दरावर परिणाम
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांत मक्‍याला मागणी घटली आहे. पोल्ट्री उद्योजकांकडून मक्‍याची उचलच नसल्याने दरावर परिणाम झाला. मक्‍याचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ होण्याची शक्‍यता नाही. 
- मल्लिकार्जुन बेल्लद, व्यापारी गडहिंग्लज 

अडचणीचा डोंगर
कमी पाण्यात येणारे पीक म्हणून मक्‍याला शेतकऱ्यांची पसंती आहे. दूध व्यवसायासाठी मक्‍यातून ओल्या चाऱ्यासह कडबाही मिळत असल्याने मका घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यंदा दर घसरल्याने मका उत्पादकांसमोर अडचणीचा डोंगर आहे. 
- चंद्रकांत नाडगोंडा, मका उत्पादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Price Of Maize Has Halved Kolhapur Marathi News