शाळा दत्तक घेतल्या, पुढे काय?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

नावीन्यपूर्ण उपक्रमाची कागदावरच चर्चा; पूर्वी दत्तक घेतलेल्या उपक्रमाचेच कौतुक
 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा दत्तक घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जवळपास सर्वच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांनी शाळा दत्तक घेतल्या आहेत, मात्र या शाळांचे पुढे काय झाले, याची कल्पना कोणालाच नाही. हा उपक्रम घेण्यापूर्वीच काही सदस्यांनी स्वत:हून दत्तक घेऊन काम सुरू केले आहे. केवळ त्याचीच माहिती पुढे करून उपक्रमाचे गोडवे गायिले आहेत.

नवीन पदाधिकारी आले, की नवीन योजनांची घोषणा करायची, ही जिल्हा परिषदेची परंपरा आहे. काहींनी फक्‍त साहित्य खरेदी करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यावेळीही मोठ्या हौसेने शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी जिल्हा परिषद शाळा दत्तक घेण्याची योजना आणली. शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश असून, या शाळांना सर्व सुविधा दिल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली होती, मात्र आतापर्यंत या शाळांकडे काय साधनसामग्री उपलब्ध आहे, कशा पद्धतीने या शाळांचा विकास होणार याचे धोरण मात्र निश्‍चित झाले नव्हते. शाळा दत्तक योजनेची घोषणा करून चार महिने होत आले आहेत, मात्र या योजनेची प्रगती अजूनही गुलदस्त्यात आहे. केवळ सदस्यांनी शाळा दत्तक घेतल्या आहेत, एवढेच उत्तर सध्या तरी शिक्षण विभागाकडून दिले जात आहे. 

हेही वाचा- पिचकारी नव्हे तर,कोरोनाचे स्फोटकच  : थुंकीमुक्त कोल्हापूर मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद -

कणेरीवाडी शाळेचा कायापालट
कणेरीवाडीची जिल्हा परिषदेची शाळा ही सध्या चर्चेत आहे. जिल्ह्यात मोठ्या पटसंख्येची शाळा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शिल्पा खोत व माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी या शाळेचा विकास करण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे या शाळेचा कायापालट झाला आहे. 
तसेच शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांनीही मिणचे (ता. हातकंणगले) येथील शाळेचा विकास करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, मात्र अशाप्रकारे जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न किती सदस्यांनी केला, या प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी शिक्षण विभागाकडे नाही.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: primary education department of the Zilla Parishad has taken the initiative to adopt the school