अज्ञानामुळे वीरपत्नींच्या आयुष्यातील वाढतोय गुंता: प्रा. कांबळे यांच्या संशोधनातून वेध

नंदिनी नरेवाडी-पाटोळे
Tuesday, 22 December 2020

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या वीरपत्नींना आर्थिक, सामाजिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापूर: देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या वीरपत्नींना आर्थिक, सामाजिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रूढी, परंपरा आणि कायदे, नियमांविषयीचे अज्ञानामुळे त्यांच्या आयुष्यातील गुंता वाढत असल्याचा निष्कर्ष येथील प्रा. रिना कांबळे यांच्या संशोधनातून पुढे आला आहे. 

प्रा. कांबळे यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यातील सैन्य दलातील जवानांच्या विधवांची सामाजिक, आर्थिक स्थिती’ या विषयावर संशोधन केले आहे. नुकतीच त्यांना शिवाजी विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ची मिळाली आहे. भरती होणाऱ्या जवानांत ग्रामीण युवकांची संख्या मोठी आहे. पती शहीद झाल्यानंतर त्यांच्या संघर्षाला सुरवात होते. ग्रामीण महिलांत उच्च शिक्षणाचा अभाव असल्याने स्वतः नोकरी करून आत्मनिर्भर होण्यास त्या सक्षम नसतात. वीरपत्नी व जवानांच्या विधवांचा आर्थिक स्तर अजूनही खालावल्याचे निरीक्षण प्रा. कांबळे यांनी नोंदवले आहे. 

वीरपत्नींना पेन्शन किती मिळणार, याची तरतूद केली आहे. बहुतांश जवान हे शिपाई, लान्स नाईक, नाईक, लान्स हवालदार व हवालदार या पदांवर सैन्यात कार्यरत आहेत. यापैकी ३८.८ टक्के वीरपत्नींना पाच ते दहा हजारांची पेन्शन मिळते, तर ३४.६ टक्के वीरपत्नींना ११ ते १९ हजार रुपयांची पेन्शन मिळते. 
प्रा. कांबळे यांनी डॉ. अर्चना जगतकर-कांबळे (समाजशास्त्र विभागप्रमुख, न्यू कॉलेज) यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी संपादन केली. विभागप्रमुख डॉ. जगन कराडे, ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील आदींचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.   
 

पुनर्विवाहाबाबत उदासीनता
तारुण्यात वैधव्य आल्यानंतर वीरपत्नींच्या पुनर्विवाहाचा विचार होताना दिसत नाही. पुनर्विवाह केला तर पेन्शन सवलती मिळणार नाहीत, या चुकीच्या माहितीमुळे जवानांची विधवा पुनर्विवाहासाठी तयार होत नाही. जिल्हा सैनिक मंडळाकडूनही वीरपत्नींच्या पुनर्विवाहासाठी जनजागृती केली जाते. विवाहाचा खर्च सैनिक कल्याण मंडळ करते, तरीही रूढी परंपरा आणि कुटुंबीयांच्या उदासीनतेमुळे त्यांचा पुनर्विवाह होत नाही.

शहीद जवानांवर आधारित एका टीव्ही शोवरून मला संशोधनाचा विषय सुचला. २०१३ ला माझ्या या विषयाला मान्यता मिळाली. त्यानंतर मी जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांमधील पाचशे वीरपत्नी, जवानांच्या विधवा व युद्ध विधवांना भेटून माझे संशोधन कार्य पूर्ण केले. 
- प्रा. रिना कांबळे

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor rina kamble research by Problems of soldier wife