सीईओ साहेब, 'तर मला सगळंच बाहेर काढावे लागेल' ; राजू शेट्टींचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

इंजेक्‍शनचा पुरवठा न करून ते रुग्णांच्या मरणाची वाट पाहत आहेत का, असा प्रश्‍नही शेट्टी यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर : रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाही म्हणून रुग्ण तडफडत आहेत, वारंवार सूचना करूनही त्याची दखल घेत नसाल तर मला तुमची सर्व प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला.  शेट्टी यांनी मित्तल यांच्या कारभाराचा पंचनामा केला. काही रुग्णांना इंजेक्‍शन उपलब्ध व्हावीत, यासाठी शेट्टी यांनी मित्तल यांना फोन तसेच मेसेजही केला होता, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या शेट्टी यांनी मित्तल यांच्या कारभारावर आसूड ओढला आहे. 

हेही वाचा - Video : एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता  : कोल्हापुरात एक हजारांहून अधिक महिलांचा मोर्चा 

शेट्टी म्हणाले, "जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गरीब लोक उपचारासाठी तडफडत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन गोरगरीब लोकांच्या आवाक्‍याबाहेर आहे. जिल्हा परिषदेने ही इंजेक्‍शन देण्याचा चांगला निर्णय घेतला. इंजेक्‍शन नेण्यासाठी लोक रात्रंदिवस जिल्हा परिषदेच्या गोदामाबाहेर थांबली, मात्र पंधरा दिवसांपासून ही इंजेक्‍शन मिळणे बंद झाले आहे. लोक इंजेक्‍शनसाठी फेऱ्या मारत आहेत, तर रुग्ण जिवाच्या आकांताने इंजेक्‍शनची वाट पाहत आहेत. ही इंजेक्‍शन मिळावी म्हणून मित्तल यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. इंजेक्‍शनचा पुरवठा न करून ते रुग्णांच्या मरणाची वाट पाहत आहेत का, असा प्रश्‍नही शेट्टी यांनी उपस्थित केला.

 "सध्या जिल्हा परिषदेची कोविडमधील खरेदी राज्यात गाजत आहे. या खरेदीची कागदपत्रे जुळवण्यात मित्तल गुंग आहेत. पुरवठादार, कंत्राटदारांचे फोन घेण्यास व प्रतिसाद देण्यास त्यांना वेळ आहे, मात्र सामान्य लोकांच्या प्रश्‍नासाठी त्यांना वेळ नाही. त्यांच्या या भानगडी खपवून घेणार नाही. मित्तल यांना कोणत्यातरी ठेकेदारामार्फत खरेदी करण्यासाठी मी फोन केला नव्हता, असेही शेट्टी म्हणाले. 

हेही वाचा - गावभर कोरोनाचा प्रसाद : क्वारंटाईन व्यक्तीवर शिरोली ग्रामपंचायतीची करडी नजर -

गोरगरीब लोकांना इंजेक्‍शन पुरवठा करावा, यासाठी फोन केला होता, मात्र त्यांची वागणूक ही बेजबाबदारपणाची असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांनी आतापर्यंत या अधिकाऱ्याला इथे ठेवलेच कसे, असा प्रश्‍न करत कोविड खरेदीतील भानगडी बाहेर काढण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetti criticised to CEO aman mittal on the topic of remdesivir medicine in kolhapur